श्रीगोंद्यात हत्ती गवतापासून होणार इंधन निर्मिती

कोळगावात उभारणार प्रकल्प : ग्रामस्थांच्या हस्ते भूमीपूजन
श्रीगोंद्यात हत्ती गवतापासून होणार इंधन निर्मिती

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

हत्ती गवतापासून (नेपिअर) जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपुजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पात पर्यायी इंधन आणि सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. याचा लाभ शेतकर्‍यांना होणार आहे. तसेच स्थानिक नागरीकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे.

कोळगावमध्ये एमएलसी अंतर्गत प्रचेता क्लिनफ्युअल लिमिटेड व शिधा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहत आहे. सध्या पेट्रोल, डिझेलचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले असून सातत्याने इंधनाच्या किमंतीमध्ये वाढ होत आहेत. पर्यायी इंधन म्हणून भारत सरकारने प्लल बायो सीएनजी प्रकल्प, बायो पीएनजी प्रकल्प, तसेच सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याच हेतूनेे कोळगावमध्ये हा प्रकल्प होत असून भूमीपुजन प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे, एमएलसी कंपनीचे रणजित दातार, कंपनी हेमंत उपोरे, माजी सभापती पुरूषोत्तम लगड, जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब साबळे हेमंत नलगे, बाळासाहेब मोहरे, बाळासाहेब नलगे, डी.एल लगड, प्रेमकाका भोईट, मयूर पंधरकर, उपसरपंच अमित लगड आदी उपस्थित होते.

हत्ती गवताला गनिगोल, नेपिअर गवत देखील संबोधले जाते. या गवतावर प्रक्रिया करून जैविक इंधन निर्मिती करण्यात येणार असून प्रति टन एक हजार रुपये भावाने हे गवत कंपनी खरेदी करणार आहे. या कंपनीचे शेतकरी सभासद फी 250 रुपये व शेअर फी 250 रुपये असून क्षमते नुसार शेअर विकत घेता येणार आहेत. तालुक्यात किमान दहा हजार सभासद करण्यात येणार आहेत. यानंतर सभासद शेतकर्‍यांना बियाणे पुरवणे या पिकासाठी लागणारी सेंद्रिय खत देखील पुरवले जाणार आहे.

साधारण तीन महिन्यांत हे पीक काढणी योग्य झाल्यानंतर संबंधीत कंपनी स्वत:चे मनुष्यबळ वापरून ते विकत घेणार आहेत. उत्पादन गिनिगोल गवत साधारण दोन महिन्यांत 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. तीन महिन्यांत एकदा कापणी केली, तरी साधारणपणे वर्षातून चार वेळा कापणी होणार आहे. एका एकरामध्ये किमान 40 ते 50 टन निर्मिती प्रक्रिया उत्पादन शेतकर्‍याला यातून मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com