crime news
crime news
सार्वमत

श्रीगोंदा : देऊळगावात मोर आणि काळविटाची हत्या

मटण शिजवून खाल्ले; दोन जण ताब्यात

Arvind Arkhade

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या ताब्यात असलेल्या देऊळगाव येथील वनक्षेत्रात वावर असणार्‍या वन्यजीवांची शिकार केली यात एक काळवीट आणि एक मोराची हत्या करून मटण शिजवून खाल्ले असल्याचा संशयावरून गावातील दोघांना ताब्यात घेतले असल्याचे गावातले नागरिकांनी माहिती दिली. उशिरा याबाबत अधिकृत माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांनी दिली. शिकार केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात असून उद्या न्यायालयात हजर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्यातील देऊळगावमध्ये एक पक्षी आणि एक प्राणी याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली असल्याने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन कर्मचारी हे या गावात दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला दाखल झाले होते. त्यांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती उशिराने दिली.

या गावात वनक्षेत्र असल्याने या जंगलात वन्य प्राणी, पक्षी यांच्यासह अन्य वन्य जीवांचा वावर आहे. गावात काही घरांमध्ये वन्य पक्षी आणि वन्य प्राणी यांचे अवयव असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्याने त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी गावात दाखल झाले होते.त्यांनी एक घरातून मटण ताब्यात घेतल्याची माहिती वनपाल हौसराव गारुडकर यांनी दिली. मात्र या मटणाच्या नमुन्याची तपासणी होणार असल्याने अधिक माहिती देण्याचे त्यांनी दुपारी सांगितले.

याची अधिकृत माहिती घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू याना फोन लावला असता तुम्हाला सगळी माहिती काही वेळात देतो असे सांगितले. त्यानंतर त्यानी पुन्हा फोन कॉल स्वीकारला नाही. काही वेळाने फोनच बंद करून ठेवल्याने या वन्यप्राणी आणि पक्षी यांच्या हत्याकांड याबाबत उशिरापर्यंत माहिती मिळाली नव्हती.

उशिराने स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांनी फोन करून याबाबत माहिती देताना सांगितले की एक काळवीट आणि एक मोर याची हत्या करण्यात आली. घटनास्थळी काही अवयव सापडले असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पाऊस असल्याने आणि जास्त फोन येत असल्याने मोबाईलची अडचण आली होती असे त्यांनी सांगितले. वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Deshdoot
www.deshdoot.com