
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करीत 4 इसमांची सुटका केली असून या कारवाईने वेठबिगारी करून घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी ढवळगाव नजीक एका विहिरीत अनोळखी अपंग व्यक्तीचा पाण्यावर तरंगणारा मृतदेह आढळून आला होता. सदर घटनेचा तपास करत असताना बेलवंडी पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहीती मिळाली की, श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यात काही इसमांच्या टोळ्या मानवी तस्करी करून त्यांना डांबून ठेऊन मारहाण करीत वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून घरचे व शेतातील काम करून घेत त्यांच्याकडून विविध रेल्वे स्टेशनवर भीक मागवून घेत आहेत.
असे इसम मयत झाल्यानंतर त्यांना पाण्यात किंवा बेवारसपणे टाकून देतात. असे इसम काही विटभट्ट्यावर आणि शेतातील बागेत कामावर असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पीएसआय राजेंद्र चाटे आणि पोलिस कर्मचारी यांची स्वतंत्र तीन पथके तयार करून बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत शोधमोहीम सुरू केली.
शोधमोहीम सुरू असताना खरातवाडी ता. श्रीगोंदा येथे पिलाजी कैलास भोसले याच्याकडे सलमान उर्फ करणकुमार रा. छत्तीसगड या इसमाची सुटका केली. घोटवी शिवारात बोडखे मळा येथे अमोल गिरीराज भोसले याच्याकडे ललन सुखदेव चोपाल रा. बिहार हा इसम मिळून आल्याने त्याची सुटका करण्यात आली. तसेच घोटवी शिवारातील अशोक दाऊद भोसले आणि जंग्या गफूर काळे यांच्याकडील इसम भाऊ हरिभाऊ मोरे रा.अंबेजोगाई, बीड याची तावडीतुन सुटका करण्यात आली.
या आरोपींना अटक करून अधिक तपास केल्यावर त्यांनी यापूर्वी एका इसमास सुरोडी येथील मारुती गबुललाल चव्हाण यास 5000 रुपयांस विकले असल्याचे सांगितले. सुरोडी शिवारात जाऊन खात्री करून शव श्रीश रा. कर्नाटक या इसमाची सुटका करण्यात आली आहे. सदर आरोपींच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.