श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी व्यापारी करत असले तरी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा

दीड ते दोन हजार रुपये कमी देत कापूस खरेदी केली जात आहे. केवळ चार हजार ते साडेचार हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी होत असताना अगोदरच अवकाळीचा झटका बसलेल्या शेतकर्यांना कापूस कमी भावात विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जर इथे कापूस विकला नाही तर अद्याप हमी भाव केंद्र सुरु झाले नसल्याने कापूस घरात साठवता येत नसल्याने कमी भावात कापूस विकावा लागत आहे.

केंद्र सरकारने कापसाला प्रति क्विंटल हमीभाव 5515 ते 5825 रुपये जाहीर केला. सरकार हमी भाव जाहीर करत असले तरी व्यापारी या हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करत आहेत. बाजरी 800 ते, 900 रुपये क्विंटल, मका 1200 रुपये क्विंटल अशाच प्रकारे खरीप हंगामातील शेतमाल कमी किमतीत खरेदी होत आहे.

आता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरु केली आहे. शेतकर्यांना 4000 ते 4700 रुपये प्रती क्विंटल भाव देऊन पक्के बिल न देता साध्या चिठ्ठीवर हिशोब देऊन शेतकर्यांना वाटे लावले जाते. शेतकर्यांची 1200 रुपये ते 1500 रुपये क्विंटलप्रमाणे लूट केली जात आहे. याकडे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक मंडळ जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांनी हजारो क्विंटल कापूस श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितील व्यापार्यांना विकला. शेतकर्यांच्या पांढर्या सोन्याची लाखो रुपयांची दिवसाढवळ्या लूट करून आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांची दसर्यापूर्वीच लूटमार सुरू केली आहे. कापूस हमीभाव 5515 ते 5825 रुपये याप्रमाणे शेतकर्यांना बाजार भाव द्यावा व घेतलेला कापूस विक्रीसाठी हमीभाव केंद्रात जातो? का दुसरीकडे जातो? या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.