श्रीगोंदा कारखान्याला गाळप परवाना देऊ नये

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे साखर आयुक्तांना पत्र
साखर कारखाना
साखर कारखाना

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील प्रतिष्ठित श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याकडून पर्यावरण कायद्याचे तसेच नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे कारखाना चालू ठेवणे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. या निष्कर्षापर्यंत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ पोहोचले असून कारखान्यास या वर्षी ऊस गाळपासाठी परवानगी देण्यात येऊ नये असे पत्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने साखर आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

घोडनदी आणि आसपासच्या शेतीजमीनींच्या प्रदुषणास कारणीभूत ठरत असूनही प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याप्रकरणी काष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते व नुकसानग्रस्त शेतकरी सचिन सुदामराव पाचपुते यांनी वकिलांमार्फत राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी राष्ट्रीय हरीत न्यायालयाकडून त्रीसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र नियंत्रण मंडळाच्या आयुक्तांना दिलेल्या पत्रामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच कारखान्याच्या गव्हाण पुजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या या पत्रामुळे कारखान्याला यावर्षी उसाचे गाळप करता येणार नाही. याप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील सुनावणीच्या वेळी आम्ही राष्ट्रीय हरित न्यायालयात पर्यावरणाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून पोल्युटर पेज (प्रदुषण करणारा भरेल) या तत्वानुसार व पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कारखान्याला दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी करणार आहोत, असे याचिकाकर्त्यांचे वकिल अ‍ॅड. विकास शिंदे यांनी सांगितले.

25 लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला जाग आली असून प्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्यांचे तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कारखान्याने जमा केलेली बँक हमीची रक्कम रुपये 25 लाख जप्त करण्याच्या सुचना प्रदुषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी बँकेला दिल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com