भक्तीमय वातावरणात बाप्पा विराजमान !

पोलीस अधिक्षकांच्या हस्ते श्री विशाल गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठा
भक्तीमय वातावरणात बाप्पा विराजमान !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सकाळपासून धावपळ, पुजेचे साहित्य खरेदीची लगबग, दुर्वा, पानफुले, प्रसादाची तयारी, उकडीचे मोदक अन् मुहूर्त साधत मंगळवारी मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात बाप्पांचे आगमन झाले. यावेळी वाजत गजत घरगुती गणेश उत्सावासह सार्वजनिक गणेश उत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली. दुष्काळाचे मळभ दूर होऊन आनंदरुपी पावसाच्या जलधारा बरसू दे, अशी मनोमन प्रार्थना करत नगरकरांनी बाप्पांचे जोरदार स्वागत केले.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याहस्ते नगरच्या मानाच्या श्री विशाल गणेश मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ओला यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा केली. पुजेनंतर नगरच्या नाद या ढोल पथकासमेवत अधीक्षक ओला यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी आणि दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवारी सकाळपासून शहरातील चितळे रस्ता, दिल्ली गेट, माळीवाडा यासह सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाईन, कल्याण रस्ता, भिंगार, एमआयडीमधील नागापूर, बोल्हेगाव फाटा, गजानन कॉलनी याठिकाणी बाप्पांच्या पूजा साहित्य, सजावटीचे साहित्य, हार, फुलांच्या दुकानात भाविकांची मोठी गर्दी होती. आपल्या लाडक्या बाप्पांसाठी अबालवृध्द विविध साहित्य खरेदी करताना दिसत होते. दुपारपर्यंत घरगुती गणेश प्रतिष्ठापनाचे मुहूर्त असल्याने सर्वांची लगबग सुरू होती.

यंदा पाऊस नसला तरी बाप्पांच्या मूर्तीच्या किंमतीत वाढ दिसून आली. यासह पुजेसाठी आवश्यक असणार्‍या कापूर, कंठी, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई, निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आली. फुलांच्या बाजारात शेवंती, तुळजापुरी, गुलाब, निशिगंध यासी झेंडूच्या फुलांची रेलचेल दिसून आली. मंगळवारी बाप्पांचे आगमन झाले असून पुढील 9 दिवस घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सवाची रेलचेल राहणार असून या काळात पावसाने आपले आगमन करत सर्वांना सुखी करावे, अशी प्रार्थना सर्वांच्यावतीने करण्यात आली. नगर शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्याची धूम काल पहावयास मिळाली.

दरम्यान, मंगळवारी नगरच्या श्री विशाल गणपतीस 1 हजार 333 गुलाबांच्या फुलांचा गुच्छ डॉ. दीपक हरके, दीपक तलरेजा व किशोर तलरेजा यांच्याकडून अर्पण करण्यात आला. यावेळी अधीक्षक ओला, भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर आणि श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून याबाबतचे प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक ओला यांच्याहस्ते हरके व तलरेजा यांनी स्वीकारले. डॉ. हरके यांचा हा 180 वा विश्व विक्रम आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com