यंदा योग्य माणसाच्याच हातून पांडुरंगांची पूजा - खा.डॉ.विखे

यंदा योग्य माणसाच्याच हातून पांडुरंगांची पूजा - खा.डॉ.विखे

श्रीक्षेत्र ताहाराबादला प्रस्थानापूर्वी खा. विखेंच्या हस्ते पालखी पूजन

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पंढरीचा पांडुरंग नेहमी योग्य माणसाला आषाढीच्या पूजेसाठी बोलावतो. यावर्षीही योग्य माणसाच्या हस्तेच पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होईल, याबाबत सर्वांनी निश्चिंत रहावे. हे ठरविणारे आपण नाही तर पांडुरंगच आहे, असे प्रतिपादन करीत वारकर्‍यांच्या साक्षीने खा. डॉ. सुजय विखे यांनी महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचे संकेत दिले आहेत.

राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी पालखी पूजन खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री संतकवी महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते. खा. डॉ.सुजय विखे म्हणाले, करोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून दिंडी सोहळा बंद होता. मात्र, आता यावर्षी पांडुरंगाला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी जात आहेत. या वारकर्‍यांची व दिंडीची व्यवस्था व्हावी म्हणून गेली काही दिवसापासून मी प्रयत्न करत आहे.

नगर-मनमाड रोड व नगर ते करमाळा हा सर्व मार्ग सध्या काम सुरू असल्याने अडथळ्यांचा बनला आहे. मात्र, मी केंद्राकडून तातडीने 13 कोटी रुपये मंजूर करून घेऊन दिंडीसाठी ज्या ठिकाणी काम सुरू आहेत, त्या ठिकाणी तातडीने मुरूमीकरण करून मार्ग उपलब्ध करून देण्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत. खांदलेले रस्ते त्यामुळे दुरुस्त होऊन या मुरमीकरण केलेल्या रस्त्यावरून दिंडी जाऊ शकते व त्यामुळे अनेक अपघात होण्याचे थांबतील. त्याचबरोबर वारकर्‍यांना देखील जाण्यासाठी योग्य मार्ग मिळेल. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघता वारकर्‍यांनी यामध्ये लक्ष न देता पांडुरंगाचा धावा करावा.

पांडुरंगाच्या मनामध्ये जो असतो, त्या माणसाच्या हस्तेच दरवर्षी आषाढीची महापूजा होते. यावर्षीदेखील योग्य माणसाला पांडुरंग नक्कीच आपल्या सेवेसाठी बोलावून घेणार आहे, यात कुणी शंका बाळगू नये. वारकर्‍यांसाठी करता येईल तेवढ्या सर्व सुविधा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यावेळी विखे यांनी ताहराबाद येथील पालखी मार्गासाठी 25 लक्ष रुपये देण्याचे घोषित केले. त्याचबरोबर या संस्थांनसाठी तातडीने रुग्णवाहिका देखील देण्यात आली. त्याचबरोबर या संस्थांनसाठी जेवढे काही करता येईल, ते करण्याचा मी प्रयत्न केले, असा शब्द त्यांनी दिला.प्रास्ताविक नारायण झावरे यांनी केले.

यावेळी संतकवी महिपती महाराज ट्रस्टचे उपाध्यक्ष अविनाश कांबळे, सरपंच सुनीता झावरे, विश्वस्त आसाराम ढुस, सुरसिंगराव पवार, मच्छिंद्र कोहकडे, संजय कांबळे, बाबासाहेब वाळुंज, अ‍ॅड. अशोक किनकर, श्रीकृष्ण कांबळे, शिवाजी सयाजी गाडे, दिंडीप्रमुख नाना महाराज गागरे, पंचायत समितीच्या सदस्या मनीषा ओहोळ, नानासाहेब गागरे, साहेबराव म्हसे, कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, सुखदेव मुसमाडे यांच्यासह ग्रामस्थ, वारकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com