साई संस्थानचे लाडू विक्री काऊंटर सुरु

साई संस्थानचे लाडू विक्री काऊंटर सुरु

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने श्रींचे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसादरुपी बुंदीच्या लाडू पाकिटांची विक्री दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी पासून सुरु करण्यात आले असून द्वारकामाई समोरील नाट्यगृह येथे लाडू विक्री काऊंटर सुरु करण्यात आलेले आहे.

श्री साईबाबा संस्थानमार्फत सन 1990 पासून श्रीक्षेत्र शिर्डी येथे येणार्‍या साईभक्तांना तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची आदींचा समावेश करुन बुंदीच्या लाडूची प्रसाद स्वरुपात विक्री केली जाते. देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दि. 5 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे सशुल्क लाडू प्रसाद पाकीट विक्री पुर्णत: बंद करण्यात आले होते.

राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2021 पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेवून संस्थानचे साई प्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्यात आलेले होते. दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी पासुन श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरु करण्यात आलेले आहे. तसेच कोविड 19 चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुनश्च सुरू करण्यात येवून काल 9 डिसेंबरपासुन लाडू प्रसाद विक्री सुरु करण्यात आलेली आहे.

संस्थानच्या वतीने 3 लाडू असलेल्या पाकिटात ना नफा ना तोटा या तत्वावर 25 रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे. सदरचे लाडू विक्री काऊंटर हे व्दारकामाई समोरील नाटयगृह येथे सुरु करण्यात आले असून साईभक्तांकडून या लाडू प्रसाद पाकीटास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार संस्थानच्या वतीने टप्या-टप्याने इतरत्र ही लाडू विक्री काऊंटर सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com