
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
करोनात गुलाब उत्पादक शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्या काळात लॉकडाऊनमुळे फुलांना बाजारपेठ नव्हती. आता सर्व 8 ते 9 महिन्यांपासून सुरळीत आहे, परंतु साईबाबा संस्थान मंदिर परिसरात फुले विक्रीस अद्यापही परवानगी देत नाही. काही दिवसांत श्रावण महिना सुरू होणार असल्याने संस्थान फुलांना मंदिर परिसरात नेण्यास परवानगी द्यावी, या प्रश्नात आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून फूल उत्पादकांना, विक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.
दोन वर्षे करोनाने सर्वांनाच अर्थिक अडचणीत आणले. अनेकांनी आपल्या शेतातील फूलबागा काढून टाकल्या होत्या. काहींनी तशाच ठेवल्या, आता पुन्हा नविन लागवडी वाढत आहेत. शिर्डी सारख्या पवित्र तिर्थक्षेत्रामुळे गुलाबाला चांगली बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत गुलाबाबरोबरच सब्जा, झेंडू, गुलाब, गलांडा, इतर फुलांना मागणी असते. गुच्छवाले, हार, दुकानदार, ओवणी (फुले ओवणारे) यांची रोजी रोटी त्यावर चालते.
करोना काळात मंदिर बंद होते. घटस्थापनेपासून मंदिर सुरू झाले. साईबाबा संस्थानने मंदिर परिसरात फुले विक्रीस बंदी केलेली आहे. आता मंदिर सुरू होऊन आठ ते नऊ महिने उलटले तरी बंदी उठविलेली नसल्याने 500 ते 1 हजार शेतकरी, दुकानदार, विक्रेते यांची रोजीरोटी धोक्यात असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
साईबाबांच्या पुजेसाठी फुले आवश्यक आहेत. परंतु प्रशासन फुलांना मंदिरात नेऊ देत नाही. त्याचा फटका फूल उत्पादक शेतकरी, विक्रेते यांना बसत आहे. या काहींची रोजीरोटी फुलांच्या व्यावसायावर अवलंबून आहे. राज्यात सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी फुलांना बंदी नाही. मात्र शिर्डीला बंदी करण्यात आली आहे.
गुलाबाबरोबरच सब्जा, गुलछडी, झेंडू, गलांडा आदी फुलांची शेती शेतकरी वर्गाने जिवापाड जपली आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्ष घालावे, व संस्थानच्या प्रशासनाला अथवा मुख्यमंत्री यांना या प्रश्नी लक्ष घालण्यास भाग पाडावे, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. साईबाबा संस्थानने शेतकर्यांच्या, फूल विक्रेत्यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ फुले विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वच फूल विक्रेते व फूल उत्पादक करत आहेत.