अज्ञानरुपी अंध:काराकडून प्रकाशाकडे नेतात ते खरे सद्गुरू - महंत रामगिरी

श्रीक्षेत्र सराला बेटात गुरूपौर्णिमा उत्सव
अज्ञानरुपी अंध:काराकडून प्रकाशाकडे नेतात ते खरे सद्गुरू - महंत रामगिरी

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

अज्ञानरुपी अंध:कारावर जो ज्ञानरुपी प्रकाश टाकतो, तो गुरू! आज जे कोणी अध्यात्मविद्या जाणणारे संत सत्पुरुष आपल्याला दिसतात ते सर्व सदगुरुशरण आहेत. प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे दैवी अवतारदेखील त्यांच्या मानवी लीलेमध्ये वसिष्ठ, संदिपानी या गुरूंपुढे नतमस्तक झाले. आपण ही योगीराज गंगागिरी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांच्या पुढे नतमस्तक असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटावर आज गुरू पौर्णिमेला सकाळी 7 वाजता महंत रामगिरी महाराज यांनी सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरी महाराजांच्या चरणपादुकांना जलाभिषेक केला. उपस्थित भाविकांसमोर आपल्या प्रवचनात गुरुचा महिमा सांगत महंत रामगिरी महाराजांनी भाविकांनी उपदेशही केला.

मनाची कामना कामधेनू पूर्ण करते. तसे सदगुरू शिष्याला परिपूर्ण बनवितात. अज्ञानाचे आवरण दूर करतात ते सदगुरू असतात. अज्ञानरुपी अंध:कारावर जो ज्ञानरुपी प्रकाश टाकतो, तो गुरु! व्यास पौर्णिमेबद्दल विवेचन करताना महाराज म्हणाले, व्यास म्हणजे ज्याची बुध्दी विशाल आहे. विश्वातील सर्व घटना व्यासांनी लिहून ठेवल्या आहेत. विश्वाचे गुरू व्यास आहेत. व्यास हे भगवंताचे अवतार आहेत. गुरू हे भगवंताचे एक रुप आहे. म्हणून गुरुचे पूजन करतात. अंत:करणात जिज्ञासा असेल तर कृपा होत असते असेही महाराज म्हणाले.

व्यासपिठ!

व्यास हा व्यक्तिवाचक शब्द नाही, व्यास म्हणजे विस्तार! व्यासपिठाबाबत महंत रामगिरी महाराज म्हणाले, एखाद्या कार्यक्रमात व्यासपिठ असते, ते व्यासपिठ याचा अर्थ ज्ञानाचा विस्तार ज्याठिकाणी होतो ते व्यासपिठ. गुरूशिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

याप्रसंगी सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, अभय पाटील चिकटगावकर, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, संदीपान महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, गणेश महाराज शास्त्री, अमोल महाराज बडाख, दादासाहेब महाराज रंजाळे, माउली महाराज, महेंद्र महाराज निकम अदिसह बेटातील शिष्यगणासह अनुयायी भाविक उपस्थित होते. यावेळी अभय पाटील चिकटगावकर व भडके पाटील यांच्या वतीने उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.

Related Stories

No stories found.