संगमनेर व संजीवनी कारखान्याने कर्ज घेऊन गणेश कारखाना चालवावा

कर्जाचा बोजा न चढविण्याची मागणी
संगमनेर व संजीवनी कारखान्याने कर्ज घेऊन गणेश कारखाना चालवावा

राहाता |प्रतिनिधी| Rahata

गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने जिल्हा बँकेच्या कर्जावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेले आरोप कपोकल्पित आणि व्यक्तिद्वेशी भावनेतून असून, कारखाना चालविण्यात येत असलेल्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या माथी फोडण्याचा प्रकार आहे. विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात शक्ती वाया घालविण्यापेक्षा संगमनेर आणि संजीवनीने भांडवल गुंतवून कारखाना चालवून दाखवावा, गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नका, असे आवाहन गणेश करखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मुकुंदराव सदाफळ यांनी म्हटले आहे की, गणेश कारखाना निवडणुकीत दोन जबाबदार नेत्यांनी कारखाना यशस्वीपणे चालविण्याचा शब्द निवडणुकीत सभासदांना दिला आहे. आता त्यांनीच भांडवलाची गुंवणूक करणे गरजेचे आहे. डॉ.विखे पाटील सहकारी कारखान्याने कारखाना चालविण्यास घेताना स्वत:च्या हिंमतीवर भांडवलाची उभारणी करून सभासद, कामगारांचे हित जोपासले होते. संगमनेर आणि संजीवनी कारखान्याने सुध्दा भांडवलाची उभारणी करून गणेश कारखाना चालवावा. आता कर्जमुक्त झालेल्या गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नये, अशी मागणी सदाफळ यांनी केली.

कारखाना निवडणुकीत सभासदांची दिशाभूल करून तुम्ही विजय मिळवला आहे. सभासदांचा कौल मान्य करून मंत्री विखे पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून डॉ.विखे पाटील कारखान्याच्या कराराची कोणतीही अडचण गणेश कारखाना चालविताना येणार नाही असा शब्द केवळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी दिला. परंतु आज तुम्हाला कारखाना चालविताना येत असलेल्या अडचणीचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडण्याचा सुरू झालेला प्रयत्न म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी पत्रकात केली.

डॉ. विखे पाटील कारखान्याची देणी देण्याबाबत कोणतीही चर्चा करायला गणेश कारखान्याचे संचालक तयार नाहीत, परंतु कर्ज किंवा भांडवल उभारता येत नाही म्हणून लगेच विखे पाटील यांना जबाबदार धरणे म्हणजे गणेशच्या संचालकांनी आपली हतबलता स्पष्ट करून दाखवण्यासारखे असल्याचे नमूद करून विखे पाटलांवर टीका करण्यात शक्ति वाया घालविण्यापेक्षा कारखाना चालविण्याचे दायित्व संगमनेर आणि कोपरगावच्या नेत्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com