अहमदनगर (प्रतिनिधी) -

पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी नकोच या मागणीसाठी नगरमध्ये मूर्तीकार व कारागिरांचा राज्यव्यापी मेळावा

उद्या गुरुवारी होत आहे. अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटना व श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि.11) नालेगाव येथील लॉन येथे होणार्या मेळाव्यासाठी माजी मंत्री आमदार आशिष शेलार, प्रांत सचिव प्रवीण बावधनकर, प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे, शास्त्रज्ञ डॉ. जयंत गाडगीळ हे उपस्थित राहणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांनी सांगितले.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डच्या दिशा निर्देशाप्रमाणे पीओपीपासून देवी-देवतांच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याची शक्यता घाटत असून, राज्यातील सर्व मूर्तीकार याला विरोध करणार आहेत. यासाठी नगरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पीओपीवर बंदी घातल्यामुळे अनेक मूर्तिकारांची कुटुंबे उघड्यावर येणार असून, मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार होणार आहेत. पीओपी कायम बंद केल्यास अनेकांवर बेकारीची कुर्हाड ओढवणार असल्याने ही बंदी घालू नये, अशी मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून केली जाणार आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांबरोबरच महाराष्ट्र राज्यातील अमरावती, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणांहून मूर्तिकार उपस्थित राहणार आहेत. नगर जिल्ह्यातील मूर्तिकारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, सचिव संतोष रायपेल्ली, संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

रसायनाचा वापर नाही, विलगीकरणही होते

पर्यावरण कायद्याच्या नियमावलीत घातक पदार्थ म्हणून पीओपीचा समावेश नाही. परदेशातील पीओपीच्या मटेरियल जाटा शिटमध्ये पीओपी हा जलजीवनास घातक असल्याचा उल्लेख नाही. कोणत्याही प्रयोगशाळेत घातक असल्याचे सिद्ध झालेलेे नाही. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पीओपीमुळे प्रदुषण होते, याचा आजपर्यंत शास्त्रीय अभ्यास उपलब्ध नाही. जीपस्म नावाचे तुकडे भाजून नंतर गिरणीत दळून तयार केल्या जाणार्या पावडरला पीओपी म्हणतात. यात कुठेही रसायनचा वापर होत नाही. पीओपीचे पाण्यात विलगीकरण होते. त्यामुळे पाणी प्रदूषित होत नाही. पीओपीवरील बंदीचा निर्णय हा मूर्तिकारांवर व कामगारांवर अन्यायकारक आहे. पीओपीवर बंदी घालण्याची गरज नाही, असा सूर मूर्तीकारांमधून आळवला जात आहे.