शॉर्टसर्कीटने आग लागून दोन दुकान खाक

टाकळीभान येथील घटना || सुमारे 48 लाखांचे नुकसान
शॉर्टसर्कीटने आग लागून दोन दुकान खाक

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे शॉर्टसर्कीटमुळे शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आग लागून कपड्याचे दुकान व जनरल स्टोअर्स ही दुकाने आगीत खाक झाली आहे. आगीत 48 लाख रूपयांचा माल जळाल्याचा पंचनामा कामगार तलाठी यांनी केला आहे. आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

टाकळीभान-घोगरगाव रस्त्यालगत पोस्ट ऑफीससमोर अशोक तर्‍हाळ यांचे आनंद जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. या जनरल स्टोअर्स शेजारीच गणेश महावीर सिध्देश्वर यांचे कपड्याचे गोदाम आहे. शुक्रवार दि. 31 मार्च रोजी रात्री दोन्ही दुकानदार दुकान बंद करून घरी गेले. शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास शेजारी राहणार्‍या ओंकार जंगम यांना दुकानातून धुर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता कुटुंबियांना उठविले. जंगम कुटूंबातील सदस्यांनी स्वत:च्या घरातून बाहेर येण्यासाठी पत्र्याचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता शटरमध्ये विद्युत प्रवाह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते मागील दरवाजाने बाहेर गेले व आरोग्य केंद्राच्या भिंतीवरून खाली उतरून आरोग्य केंद्राच्या मुख्य गेटमधून बाहेर आले.

या घटनेची माहिती त्यांनी नानासाहेब धोंडिबा बोडखे यांना सांगितल्यावर बोडखे यांनी त्वरीत तर्‍हाळ व सिध्देश्वर यांना घटनेची माहिती दिली. या दोन्ही दुकानदारांनी दुकानांकडे धाव घेतली. यावेळी आसपासचे नागरीक घटनास्थळी जमा झाले. मात्र आतमध्ये लागलेल्या आगीमुळे या दुकानांचे शटर उघडण्यास अडचण येत होती. त्यामुळे ट्रॅक्टरच्या मदतीने शटर बाजूला करण्यात आले असता दुकानामध्ये आगीचे लोळ दिसून आले.

ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे वाहन चालक मनोज शर्मा, दिनेश बागडे, लखन दाभाडे व कर्मचार्‍यांनी ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.आग वेळीच आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा शेजारील अनेक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली असती.

आगीत अशोक तर्‍हाळ यांच्या आनंद जनरल स्टोअर्समधील स्टेशनरी, डीफ्रिज, फोटो स्टुडिओ संदर्भातील वस्तू, झेरॉक्स मशीन, मांडण्या, टेबल, खेळण्या आदी वस्तूसह सुमारे 9 लाख रूपये किंमतीचा माल आगीत खाक झाला. तसेच गणेश महावीर सिध्देश्वर यांच्या दुकानातील रेडिमेडसह कापड, महिला, लहान मुले, पुरूष आदींचे कपडे असा सुमारे 39 लाख रूपये किंमतीचा माल खाक झाला. सकाळी घटनास्थळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव निकम, वरिष्ठ तंत्रज्ञ कैलास घोळवे व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष येवून पाहणी केली व झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर कामगार तलाठी यांनी एकुण 48 लाख रुपये किंमतीचा माल जळुन खाक झाल्याचा पंचनामा केला आहे. महावितरणचे संबधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देवुन नुकसानीचा पंचनामा करणार असल्याचे समजते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com