कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील दुकानात आढळल्या तलवारी, चाकू व गुप्त्या

फेसबूकवर फोटो व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई; एकास अटक
कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील दुकानात आढळल्या तलवारी, चाकू व गुप्त्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानातून पोलिसांनी तलवारी, चाकू व गुप्त्या असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी हुमायू उर्फ मयूर शेख (रा. आशा टॉकीज परिसर) यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी दिली. दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्यासमोरच मोठा शस्त्रसाठा असतानाही फेसबूकवर फोटो व्हायरल झाल्यावर पोलिसांना याची माहिती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 14 गुप्त्या, दोन लहान तलवारी, एक मोठा सुरा, चार मोठ्या तलवारी अशी 21 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यासमोर आशा टॉकीज शेजारी अरिशा कलेक्शन नावाच्या दुकानात हा साठा आढळून आला. फेसबूक पोस्ट पोलिसांना निदर्शनास आल्यानंतर कोतवाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह तपासणी केली. त्यात हा साठा आढळून आला. आरोपीकडे कोणताही परवाना नाही. तसेच आठ इंचापेक्षा मोठा चाकू बाळगण्यास संगमनेर व नगर शहरात बंदी आहे.

आरोपीने बाहेरून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री शहरात करत होता, अशी प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या भागात कोतवाली पोलिसांचा सीसीटीव्ही आहे. सदरचे दुकान पोलीस ठाण्यासमोरच आहे. असे असतानाही फेसबूक फोटो व्हायरल झाल्यावर पोलिसांना याची माहिती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com