रांजणखोलच्या शेतकर्‍याचे श्रीरामपुरातील कपड्याचे दुकान दुसर्‍यांदा जाळण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या तपासावर प्रशचिन्ह? घटना सी. सी. टीव्ही कॅमेरात कैद
रांजणखोलच्या शेतकर्‍याचे श्रीरामपुरातील कपड्याचे दुकान दुसर्‍यांदा जाळण्याचा प्रयत्न

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोडवरील संकेत महेंद्र गिरमे यांच्या रुबाब या कपड्याच्या दुकानास एकदा नव्हे तर दुसर्‍यांदा अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हा प्रकार सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात प्रथम तक्रार नोंदवूनही पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याने दुकानास दुसर्‍यांदा शनिवारी रात्री आग लावण्याच्या प्रयत्न झाला.

श्री. गिरमे दुसर्‍या घटनेची माहिती देण्यासाठी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले असता सुट्टीचा वार असल्याचे सांगत पोलिसांनी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली, असे असले तरी दुसर्‍यांदा लागलेल्या आगीचा प्रकार सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने आरोपीस पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

श्रीरामपूर राहता तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रांजणखोल (टिळकनगर) येथील शेतकरी कुटुंबातील संकेत गिरमे यांनी शेती धंद्यात परवडत नसल्याने शेतीवर कर्ज काढून श्रीरामपूर शहरात भाडोत्री गाळ्यात कापड व्यवसाय सुरू केला. व्यवसायात हळूहळू प्रगती होत असताना पंधरा ते वीस दिवसांपासून काही अज्ञात लोकांनी या गाळ्यास आग लावण्याचा प्रकार केला. दुकान जळत असल्याचे पाहून काहींनी दुकान चालक संकेत गिरमे यांना काळविताच गिरमे घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही वेळेस लागलेल्या आगीत दुकानाचा समोरील भाग जळून खाक झाला. तसेच आतील भागात धूर गेल्याने किंमती कपड्यांना फटका बसला.

या घटनेची माहिती एकदा नव्हे तर दोनदा श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कळविली. मात्र अद्यापही आरोपीचा छडा लागला नसल्याने गिरमे यांनी नाराजी व्यक्त केली. आपण याठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरा बसविला असून दुसर्‍यांदा लावलेल्या आगीचा प्रकार यात कैद झाला आहे. पोलिसांनी पुढील तपास करून आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी गिरमे यांनी केली आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी वरील घटनेचा तीव्र निषेध केला असून भविष्यात अशा घटना होऊ नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com