दुकानातील कालबाह्य वस्तूंचे तुम्ही काय करता ?

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी दुकानदार अवाक
दुकानातील कालबाह्य वस्तूंचे तुम्ही काय करता ?

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील हॅरिसन ब्रँच शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी इ. 5 वीच्या भाषा विषयाच्या कवितेच्या अनुषंगाने प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा हा अनोखा उपक्रम सुरु केला असून त्या अंतर्गत परिसरातील किराणा दुकानदार साईनाथ जाधव या व्यावसायिकांची चालता बोलता मुलाखत घेतली. या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती, सभाधीटपणा या गुणांची रुजवणूक होणार आहे.

विद्यार्थ्यांनी साईनाथ जाधव यांना विविध प्रश्न विचारून सखोल माहिती मिळवली. कालबाह्य झालेल्या वस्तू दुकानात विक्रीला असतात का? कालबाह्य झालेल्या वस्तूंचे काय करतात? दूध पिशवी किती तासात विकणे आवश्यक आहे. शिल्लक दूध पिशव्याचे काय करतात? मापन करण्यासाठी कोणता काटा वापरतात? अशाप्रकारचे अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी माहिती जमविली. या अनोख्या मुलाखतीने व्यावसायिक साईनाथ देखील चकित झाले व दिलखुलासपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मुलांचा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जाणीव, समानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता यासारखी जीवनकौशल्य रुजली आहेत. तसेच त्यांच्यात मुक्त अभिव्यक्ती क्षमता विकसित करून अभिरुची निर्माण होण्यास सहाय्य झाले. या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचे लेखन, मार्गदर्शन मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी केले आहे. शाळेतील सार्थक देवकर, पूनम मोरे, आर्यन मैंद, प्रणव पवार,आदित्य पालवे, मिनिषा पावसे, स्वाती आव्हाड, समरीन, सादिया, पूजा, वैभव चकोर आदी विद्यार्थ्यांनी दुकानदारास प्रश्न विचारले. शाळेच्या शिक्षिका मनिषा शिंपी यांनी शाळेच्या वतीने साईनाथ जाधव यांचे आभार मानले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप पवार, पोहेगाव बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सोमवंशी यांनी सदर उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com