अकोले तालुक्यात 9 करोना बाधित
सार्वमत

अकोले तालुक्यात 9 करोना बाधित

इंदोरी येथील वृद्धाचा मृत्यू, रुग्ण संख्या पोहचली 227 वर

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. काल बुधवारी दिवसभरात नऊ व्यक्ती करोना बाधित आढळले तर इंदोरीतील 74 वर्षीय करोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील करोनाचा हा सहावा बळी ठरला आहे.

काल तालुक्यातील मोग्रस, कोतूळ, हिवरगाव आंबरे, समशेरपूर येथील 09 व्यक्ती बाधित आले आहेत. तालुक्यातील खानापूर कोव्हिड सेंटर येथे काल बुधवारी सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सहा व्यक्ती करोना बाधित आढळल्या.

यामध्ये मोग्रस येथील 47 वर्षीय पुरुष तर कोतूळ येथील 26 वर्षीय, 28 वर्षीय व 30 वर्षीय पुरुष तसेच 30 वर्षीय महिला आणि केवळ दीड वर्षीय लहान बालक अशा सहा व्यक्तींचा अहवाल करोना पॅाझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात हिवरगाव आंबरे येथील 34 वर्षीय पुरूष व समशेरपूर येथील 87 वर्षीय, 48 वर्षीय पुरुष अशा तीन जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. तालुक्यात काल दिवसभरात 09 व्यक्तींचा अहवाल करोना पॅाझिटिव्ह आला.

अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर उपचार करून बरे होण्याचे प्रमाणही जास्त असल्याने समाधानाची बाब आहे. मात्र गेल्या आठवड्यात तब्बल तीन व्यक्ती करोनाशी झुंज देताना इतर आजाराचा प्रादुर्भाव असल्याने अपयशी ठरलेत.

दोन दिवसांपूर्वी कोतूळ येथील तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर काल बुधवारी इंदोरी फाटा परिसरातील एका उद्योजकाच्या 74 वर्षीय वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचा नुकताच चार- पाच दिवसांपूर्वी करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.

तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 227 झाली आहे. आत्तापर्यंत 168 व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. तर 06 जणांचा मृत्यू झाला असून 53 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com