शनी दर्शन बंदला मोजक्या विश्वस्तांचा कोलदांडा

मर्जीतील भाविकांना स्वतःबरोबर नेऊन घडवताहेत दर्शन
शनी दर्शन बंदला मोजक्या विश्वस्तांचा कोलदांडा

सोनई |वार्ताहर| Sonai

राज्यातील मंदिरे बंद असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शनिभक्तांना शनी दर्शन बंद असले

तरी एक-दोन महिन्यांपासून काही मोजके विश्वस्त आपआपल्या मर्जीतील भाविकांना मंदिरात दर्शनासाठी घेऊन जात असल्याने ग्रामस्थ व भाविकांतून नाराजीचा सूर निघत आहे. काल शनिवारी (दि 10 ऑक्टोबर) रोजी एका विश्वस्ताने दोन भाविकांना मंदिरात स्वतःबरोबर घेऊन जाऊन दर्शन घडविले याचीही मोठी चर्चा शिंगणापुरात झाली.

शनी मंदिर बंद असल्याने अनेक शनी भक्तांची दर्शनाची इच्छा असतानाही दर्शन होत नसल्याने पाच महिन्यांपूर्वी देवस्थान प्रशासनाने मुख्य दरवाजाजवळ एक स्क्रीन लावून भाविकांसाठी दर्शन चालू केले. या निर्णयाचे अनेक भाविकांनी कौतुक केले. राज्यातील तसेच बाहेरील अनेक भाविक तेथे दर्शन घेत आहेत.

परंतु दोन ते तीन अतिउत्साही विश्वस्त आपआपल्या मर्जीतील भाविकांना सोबत घेऊन मंदिरात जात आहेत. मागील महिन्यात एका विश्वस्ताने नगर शहरातील युवा नेत्यासाठी पायघड्या टाकल्या होत्या. त्यामुळे गावातील एक तरुण नेता सायंकाळी भाविकांना घेऊन मंदिरात गेला होता. अशी ग्रामस्थांत चर्चा आहे.

विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही असे विश्वस्तांच्या बैठकीत ठरले असतानाही त्या नियमांचे पालन होत नाही. शिंगणापूर देवस्थान ग्रामीण रुग्णालयाच्या तसेच भक्त निवासमध्ये कर्मचार्‍यांनी करोना बाधित रुग्णांसाठी खूप मोठे कार्य केले असून जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वात चांगले कोव्हिड सेंटर म्हणून शिंगणापूरचा उल्लेख होत आहे.

तेथे उत्तम प्रकारे रुग्णांची काळजी घेतली जात आहे. करोना काळात देवस्थानने जे उत्कृष्ट काम केले त्याची दखल राज्य पातळीवर घेतली जात आहे परंतु अशा अतिउत्साही विश्वस्तांच्या नियम तोडल्याप्रकरणी मोठी चर्चा होत आहे.

शनी मंदिरात सर्वांना एकच नियम असावा, जो विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना मंदिरात घेऊन जाईल त्याच्यावर धर्मादाय आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी भाविकातून होत आहे.

नेवासा तालुक्यातील राजकीय, सामजिक तसेच अनेक ग्रामस्थांनी नियमांचे पालन केले असून मनात ईच्छा असूनही त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही परंतु काही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांसाठी नियम मोडत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक मोठमोठी देवस्थाने बंद आहेत. त्याप्रमाणे शिंगणापूर मंदिरही गेल्या 5-6 महिन्यांपासून बंद आहे. परंतु देवस्थानचे काही विश्वस्तच नियम पाळायला तयार नाही असे स्थानिक ग्रामस्थांकडून समजले असून या दर्शन बंद काळात 3 ते 4 अतिउत्साही विश्वस्त स्वतःच्या मर्जीतील भाविकांना बरोबर नेऊन राजरोस नियम पायदळी तुडवीत असून नियम जुमानत नाहीत तसेच देवस्थानचे सुरक्षारक्षकही विश्वस्तांना अडवू शकत नाही. कारण त्यांना नोकरी करायची आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com