शिवसैनिकांचे मनोमिलन करण्यात ना. गडाख यांना यश !

मंत्र्यांच्या आवाहनानंतर नगर शहरातील दोन्ही गटांनी एक पाऊल मागे येण्याचे केले मान्य
शिवसैनिकांचे मनोमिलन करण्यात ना. गडाख यांना यश !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील शिवसेना पक्षाची पक्ष संघटना वाढवणे, शहरात शिवसेनेचे प्राबल्य असले तरी महापालिकेत कामे होत नाहीत.

शहरातील जनतेला करोना संसर्गात प्रभावीपणे मदत व्हावी, यासाठी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नेते जलसंपदा मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या भेटीसाठी सोनईला गेले होते. यावेळी चर्चे दरम्यान पक्षातील दोन गटांनी एकमेकांवर आरोप सुरू केले.

मात्र, ऐनवेळी या गरमागरम चर्चेत हस्तक्षेप करत मंत्री महोदयांनी दोन्ही गटांना शांत केले. तसेच भविष्यात शहरात पक्षाला पुन्हा गतवैभव आणावयाचे असल्यास दोन्ही गटांनी एक पाऊस मागे येण्याची सूचना केली. ही सूचना शिवसैनिकांनी मान्य केल्याने शिवसैनिकांच्या मनोमिलनाला मंत्री ना. गडाख यांना यश आले.

माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले शिवसेनेचे नगर शहरातील नगरसेवक, पदाधिकारी शुक्रवारी मंत्री ना. गडाख यांच्या भेटीसाठी सोनईत पोहचले.

संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, अशोक बडे, गणेश कवडे, दत्ता कावरे, योगीराज गाडे यांच्यासह अन्य नगरसेवक व पदाधिकार्‍यांसोबत मंत्री गडाख यांची बैठक झाली.

शहरात सेनेचे प्राबल्य असले तरी महापालिकेत कामे होत नाहीत. करोना संकटात गोंधळलेल्या लोकांची हाल सुरू आहे. 24 नगरसेवक असले तरी विकास कामांचे प्रस्ताव मंजूर होत नाहीत. आयुक्त ऐकत नाहीत, अशी हतबलता व्यक्त करतानाच शहरातील गटातटाबाबतही अनेकांनी म्हणणे मांडले.

आगामी वर्षात महापौर पदाची निवडणूक आहे. 24 नगरसेवक असतानाही विरोधात बसण्याची वेळ आलीय. शहरात संघटन वाढीसाठी आता तुम्हीच लक्ष द्या, ताकद द्या अशी गळ यावेळी मंत्री गडाख यांना घालण्यात आली. यावेळी अचानक पक्षातील दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

मात्र, काही क्षणात मंत्री गडाख यांनी यात हस्तक्षेप करत जुने काढले तर उपयोग होणार नाही. अगोदर आपसातील हेवेदावे बाजुला करा. एकजीव व्हा. बाकी सगळे माझ्यावर सोडा, कामे कशी करायची तसेच महापालिकेवर भगवा कसा फडकावयाचा याची जबाबदारी माझ्यावर सोडा.

आपसातील भांडणात संघटनेसोबतच वैयक्तिकही तोटा सहन करावा लागतो. तुम्ही एकत्र आले तर मला जोमाने काम करता येईल. नाहीतर तुमचे भांडण मिटविण्यातच माझी ताकद वाया जाईल असे सांगत मंत्री गडाखांनीही एकजुटीचे आवाहन केले.हे आवाहन सर्वांनी मान्य केले.

नगर शहरात लवकरच बैठक

महापौर पदाची निवडणूक पुढील वर्षात होतेय. शिवसेनेचे 24 नगरसेवक असतानाही विरोधात बसण्याची वेळ आलीय. आता सत्ता असणे गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याला गडाखांनी सकारात्मक प्रतिसाद देत ती जबाबदारी माझ्यावर सोडा, तुम्ही एकत्र या. मग कोणतीही ताकद शिवसेनेला रोखू शकत नाही, असे सांगत एकीचे आवाहन केले. यासाठी लवकरच नगर शहरात शिवसेनेची जम्बो बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com