भाजपनंतर शिवसेनेलाही गळती

सामान्य शिवसैनिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपनंतर शिवसेनेलाही गळती

अहमदनगर (प्रतिनिधी) -

काल केडगावात भाजपच्या तर आज नगर शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नव्या प्रवेशामुळे नगर

शहरात काँग्रेस बळकटीच्या वाटेवर धावू पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लखन छजलानी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला. काल केडगावात भाजपचे संजय भिंगारदिवे यांनी तर आज स्व. अनिल राठोड यांचे खंदे समर्थक छजलानी यांना प्रवेश देत काँग्रेसने भाजप-सेनेला गळती लावली आहे.

यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष खलील सय्यद, अनंतराव गारदे, निजाम जहागीरदार, खजिनदार मोहनराव वाखुरे, सचिव प्रशांत वाघ, सहसचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, क्रीडा विभाग अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

लखन छजलानी म्हणाले की, स्व.अनिलभैय्यांसारखा लोकनेता यापूर्वी झाला नाही, भविष्यातही होणार नाही. परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर सामान्य शिवसैनिकांमध्ये छत्र हरपल्याची भावना आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किरण काळे यांनी निर्भीडपणे शहराला दहशतमुक्त ठेवण्यासाठी काम करत आहेत. नगरकरांना संरक्षण देण्याची ताकद केवळ काळेंमध्ये आहे. म्हणूनच सामान्य शिवसैनिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे प्रतिपादन यावेळी छजलानी यांनी केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून नगर शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी काम केले जाईल, असे आश्‍वासन किरण काळे यांनी यावेळी दिले.

छजलानी यांच्यासह शरद दिवटे, हर्षल नकवाल, करण उदास, तरुण चव्हाण, जितू छजलानी, सोनू संगत, राम छजलानी, परेश बधवणे, शुभम छजलानी, आकाश कदम, रितेश छजलानी, रितिक परदेशी, योगेश बासोडे, हर्षल वाकडे आदी सामान्य शिवसैनिकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com