
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही. कार्यक्रम व बैठकांना निमंत्रण दिले जात नाही नेहमीच डावलले जाते. यासह इतर अनेक कारणामुळे पाथर्डी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अंतर्गत नाराजी व धुसफुस वाढली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी तालुक्यातील जेष्ठ व निष्ठावान शिवसैनिकांकडून होत आहे.
मागील आठवड्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पाथर्डीत आले होते. त्यांच्या पाथर्डी तालुका दौर्याची महिती तसेच निमंत्रण दिले नसल्याने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यपातळीवर पक्षात मोठी फुट पडली असतानाही आम्ही मातोश्री व ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ आहोत. तरीही पुन्हा तीच वागणुक मिळत असल्याचे निष्ठावंत शिवसैनिक बोजत आहेत.
गेली अनेक वर्षापासुन पाथर्डी तालुक्यातील शिवसेना वाढविण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक नवनाथ चव्हाण, आसाराम ससे, विष्णुपंत पवार, अनिल फुंदे , दिलीप गायकवाड ,यमाजी भिसे, संतोष मेघुंडे, सागर राठोड, नवनाथ उगलमुगले, नवनाथ वाघ, भिवसेन अकोलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. यातील अनेकांवर माणिकदौंडी येथे झालेल्या जातीय वादात गुन्हे दाखल झाले होते. तरी ही सर्व मंडळी आजही शिवसेनेत ठामपणे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वच निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले जात असल्याचा सूर आता निघू लागला आहे.
मध्यंतरी तालुक्यात जेष्ठ नेत्याच्या उपस्थितीत अनेक शाखांचे उदघाटन करण्यात आले, तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाच्या बैठका घेण्यात आल्या मात्र या सर्वच कार्यक्रमांना मूळ व जेष्ठ शिवसैनिकांना बोलावण्यात आले नाही. गेल्याच आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पाथर्डी तालुका दौर्यावर आले असतानाही असाच प्रकार घडला.
राज्य पातळीवर पक्षात मोठी फूट पडल्या नंतर काहींनी मोहटादेवीगड ते मातोश्री अशी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला मात्र त्यालाही पक्षातूनच विरोध झाला असा आरोप आता शिवसैनिक करत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली असली तरी पाथर्डी तालुक्यात त्याचे मोठे पडसाद उमटले नाही. आता आपल्यालाच वारंवार डावलले जात असल्याने पुढे काय असा प्रश्न तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांसमोर उभा ठाकला आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही शिवसेनेचे कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रमाणिकपणे काम करत आहोत. या काळात मतभेद असले तरी पक्षाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण तरी मिळत असे. आता वर्तमानपत्र वाचल्यावर कार्यक्रम झाल्याचे समजते. आम्ही मातोश्री व ठाकरे कुटुंबालाच मानत असल्याने दुसरीकडे कुठेही जाण्याचा विचार कधीच मनात आला नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या मनातील खदखद जाणुन घेऊन त्याची दखल घ्यावी ही अपेक्षा.
- नवनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक पाथर्डी तालुका