ज्यांना जे वाटत असेल ते वाटू द्या, मात्र टायगर अभी जिंदा है!

शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा इशारा
ज्यांना जे वाटत असेल ते वाटू द्या, मात्र टायगर अभी जिंदा है!

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा ज्याठिकाणी पुतळा जाळला त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. ‘ज्यांना जे वाटत असेल ते वाटू द्या, मात्र टायगर अभी जिंदा है!’ असा सूचक इशारा यावेळीश्री. खेवरे यांनी दिला.

संगमनेर तालुक्यातील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीतून शनिवारी एका गटाने बस स्थानकाजवळ जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. यामुळे तालुक्यातील जुन्या शिवसैनिकांमध्ये संताप होता. ज्या ठिकाणी पुतळ्याचे दहन केले त्याच ठिकाणी श्री. खेवरे यांचा सत्कार करायचा असा निर्णय शिवसैनिकांनी घेतला. मंगळवारी दुपारी श्री. खेवरे यांचे संगमनेरमध्ये आगमन झाले. शासकीय विश्रामगृह येथे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. जुन्या शिवसैनिकांनी एकत्रित येऊन फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संगमनेर बस स्थानकावर जंगी सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाप्रमुख खेवरे म्हणाले, काही लोकांनी ज्या ठिकाणी चुकीचे काम केले, त्याच ठिकाणी आमच्या शिवसैनिकांनी अत्यंत चांगले काम केले आहे. आज आमच्या स्वागताला जमलेले जुने शिवसैनिक पाहून दिवाळीला जितका आनंद मिळाला नाही तितका आनंद आज प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. शिवसेनेतील गटबाजीवर भाष्य करताना त्यांनी सर्व शिवसैनिक एकसंघ असल्याचे सांगितले. पुतळा जाळणे वगैरे हा सगळा प्रकार वेगळा असून आज काही वेगळं दिसतय तो केवळ ट्रेलर आहे.

पिक्चर अजून बाकी आहे. ज्यांना कोणाला काय वाटतं असेल ते वाटू द्या, मात्र त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ हे विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या शिवसैनिकांनी शहरात तालुक्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवली, छोट्याशा रोपट्याचे झाडात रूपांतर केले. ते सगळे मूळ शिवसैनिक आज येथे जमले आहेत. या सर्वांनी शिवसेनेसाठी अंगावर केसेस घेतल्या, आपल्या प्रपंचाचे नुकसान केले, स्वतःचे नुकसान करुनही जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले ते सगळे आज माझ्यासोबत असल्याचे पाहून आपण भारावलो आहोत. आपण शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत काम केले आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आणि पक्ष वाढविण्याची आपली इच्छा आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या छोट्या-मोठ्या घटना पक्षासाठी योग्य नसल्याचे सांगत यासर्व गोष्टी पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, कलविंदर डडियाल, राहाता शहरप्रमुख गणेश सोमवंशी, नेवाशाचे हरिभाऊ शेळके, अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, श्रीरामपूरचे सचिन बडदे यांच्यासह संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख प्रसाद पवार, युवासेनेचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, माजी विधानसभा समन्वयक आप्पा केसेकर, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, दिलीप साळगट, बाजीराव कवडे, सुनील देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते, आशा इल्हे, अमोल कवडे, रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, संदेश देशमुख, रवी गिरी, समीर ओझा, मच्छिंद्र दिघे, पंढरीनाथ इल्हे, भागवत मुंगसे, विजय शिरसाठ, संतोष कुटे, सुनीता सातपुते, कावेरी नवले, शितल हासे, वनिता जगदाले यांच्यासह जुने-नवे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुने शिवसैनिक एकवटले

संगमनेर तालुक्यातील शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी वाढलेली असताना काल जुने शिवसैनिक एकवटल्याचे चित्र खूप दिवसानंतर दिसले. अनेक जुने चेहरे यावेळी पहावयास मिळाले. जयवंत पवार, बाजीराव कवडे, आप्पा केसकर, शरद पावबाके, कैलास वाकचौरे असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अमोल कवडे, प्रसाद पवार व जनार्दन आहेर यांच्या प्रयत्नातून जुने शिवसैनिक एकत्र आल्याचे दिसत होते. जवळपास सगळेच शिवसैनिक एका बाजूला दिसल्याने आता नवीन पदाधिकारी निवडताना पक्षश्रेष्ठी वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com