
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
एकेकाळी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी ज्या डोंगरावर एकनाथ शिंदे गुरे चारत असत त्याच जागेवर सध्या त्यांचे दोन हेलीपॅड व त्यांच्या मालकीचे दोन हेलिकॉप्टर. शिवसेनेने त्यांनाआणखी काय दिले पाहिजे. शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यातील अश्रुचा बदला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे यांनी केले.
पाथर्डी शहरातील विश्रामगृहावर पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी पाथर्डी तालुकाप्रमुखपदी भगवान दराडे, शेवगाव विधानसभा मतदार संघाच्या महिला संघटकपदी पुष्पा गर्जे, उपजिल्हाप्रमुखपदी शिवाजी काटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, नवनाथ चव्हाण, बाबासाहेब ढाकणे, राजेंद्र म्हस्के, रामभाऊ साळवे, उद्धव दुसंग, शेवगाव तालुकाप्रमुख अविनाश मगरे, शहरप्रमुख सागर राठोड, कोमल पवार, विकास दिनकर, नागेश लोटके, सोमनाथ फतपुरे, मंगेश राठोड सुनिल मिरपगार, गौतम कराळे, शितल पुरनाळे, भाऊसाहेब निमसे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, शिवसेनेत यापुढे फक्त निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी दिली जाईल. आयात उमेदवारांना नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरीषद निवडणुकीत सेना उमेदवारी देणार नाही. शिवसैनिक हीच उमेदवारीची अट असेल. भाजपाची चाकरी करीत होते त्यांना आपण जयमहाराष्ट्र केला आहे. शिवसेना संपवायची हा भाजपाचा डाव आहे. राज्याचे तुकडे करण्यासाठी भाजपाला शिवसेनाच विरोध करते म्हणून शिवसेना संपली की त्यांचा मार्ग मोकळा.
मात्र शिवसेना सपंणार नसून नव्या उमेदीने काम करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे दळवी यांनी उपस्थित शिवसैनिकांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगावचे शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे यांनी केले.स्वागत पाथर्डी तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी केले तर सिद्धार्थ काटे यांनी आभार मानले.
या पदाधिकार्यांची गैरहजेरी
शिवसेनेच्या कार्यक्रमाला माजी तालुकाप्रमुख रफिक शेख,अंकुश चितळे,माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत पवार,ऋषी गव्हाणे,माजी शहरप्रमुख भाऊसाहेब धस,तालुका उपप्रमुख नवनाथ वाघ,बंडू ससे,शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार डाळिंबकर, युवासेनेचे शहराधिकारी सचिन नागापुरे,संतोष मेघुंडे,सतीश वारंगुळे यांच्यासह प्रमुख शिवसैनिक मात्र गैरहजर होते.
म्हस्केंची नाराजी दूर
जिल्हाप्रमुख राजेंद दळवी भाषण करण्यासाठी उभे राहताच शिवसेनेचे राजेंद्र म्हस्के यांनी आम्हाला अपमानीत करण्यासाठी बोलवित असाल तर शिवसेनेतून काढून टाका असे सांगून नाराजी व्यक्त करत बैठकीतून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाप्रमुख दळवी यांनी म्हस्के यांची समजूत घालत नाराजी दूर केली.