शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यावर बिबट्याचा हल्ला
सार्वमत

शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यावर बिबट्याचा हल्ला

हाताचा घेतला चावा; ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

Arvind Arkhade

वडाळा महादेव|वार्ताहर|Vadala Mahadev

येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख सदाशिव कराड यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव अशोकनगर फाटा परिसरातील रेल्वे चौकीसमोर पाटाच्याकडेला नेहमीप्रमाणे रोडवरून वाहनांची वर्दळ सुरू होती यामध्ये अशोकनगर कारखाना येथून सदाशिव कराड हे आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना पाटाच्याकडेला उसामधून बिबट्याने झेप घेत श्री. कराड यांच्यावर हल्ला करत हाताला चावा घेतला व शर्टची बाही पूर्ण फाडली. घटनेचे गांभीर्य ओळखत कराड यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबट्याने तात्काळ तेथून उसाच्या दिशेने पाटातून झेप घेत पोबारा केला.

याच बिबट्याने दोन दिवसांपूर्वी एका तीन वर्षाच्या बालकाला घरासमोरून अंगणातून ओढण्याचा प्रयत्न केला होता. येथील महिलेच्या दक्षतेने बिबट्याच्या तावडीतून मुलगा बचावला आहे. तसेच काल रात्री येथील जोशी वस्तीवरील वायकर यांच्या गायीचा बिबट्याने कान तोडला आहे. खडी क्रेशर खाणीच्या परिसरात एका शेळीवरही बिबट्याने हल्ला केला आहे.

वनविभागाचे कर्मचारी एस. एम. लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती कळवली. त्यानुसार नागरिकांना परिसरात पिंजरा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. सदाशिव कराड यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय शिरसगाव येथे हलवण्यात आले होते. त्यानुसार तेथे प्राथमिक उपचार करण्यात येऊन त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून देण्यात आली.

परिसरातील नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशोकनगर फाटा, निपाणी वडगाव, राऊत वस्ती परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी लपण्यासाठी मोठी जागा उपलब्ध असून उसाचे मोठे क्षेत्र आहे. यासंदर्भात गणेश सदाशिव कराड, रवींद्र पवार, शरद देवकर, गंगाधर देसाई, चांगदेव देसाई, चंद्रकांत मोरकर, संपतराव देसाई, बाळासाहेब सुलताने, रवींद्र सुलताने, दादासाहेब देसाई आदी शेतकरी तसेच नागरिकांनी परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com