
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिवसेनाप्रमुखांचे विचार व त्यांनी उभा केलेला पक्ष आपल्याला आता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पुन्हा पुढे न्यायचा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आपले पक्षाचे चिन्ह गेले, पक्षाचे नाव गेले, मात्र शिवसैनिक हा कुठेही गेला नाही. तो उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच आहे. पक्षासाठी काम करा, गट-तट बाजूला ठेवा, आपल्या कामातून नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा कशा पद्धतीने फडकेल यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, अशा सूचना शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी दिल्या.
येथील माऊली सभागृहामध्ये आयोजित शिवगर्जना मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी उपनेते विजय कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, युवासेनेचे साईनाथ दुर्गे, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार विजय औटी, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौदर व सुरेखा कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले आदी उपस्थित होते.
उपनेते घोसाळकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आपल्याला पक्षाची बांधणी करायची आहे. शिवगर्जनेच्या माध्यमातून आम्ही पदाधिकारी व जनतेपर्यंत पोहोचत असून आगामी काळात येणार्या सर्व निवडणुकांसाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे ते म्हणाले.
उपनेते विजय कदम म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना पदे दिली, मात्र यांनी गद्दारी केली. साहेबांनी आदित्य ठाकरे यांना मंत्री केल्याने गद्दारांच्या पोटामध्ये ते दुखले व त्यामुळेच त्यांना हे सुचले, असा घनाघाती आरोप सुद्धा त्यांनी करून आता आपल्याला शिवसेनेची ताकद काय आहे, हे दाखवून द्यायचे आहे. आता शिवसेनेला मिळालेली ही संधी आहे. संकट नाही, आपण खचू नका, काम करा, गद्दारांना गाडल्याशिवाय शांत बसू नका, भाजपवाले हे हिटलरशाहीने वागत आहे. पैशाचा जोरावर यांचा सध्या बोलबाला सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
माजी खासदार सुभाष वानखेडे म्हणाले, शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली. त्यावेळेस या 40 गद्दारांनी या सरकारमध्ये मंत्रिपद घेतले. त्यांना त्यावेळेला हिंदुत्व आठवले नाही. अडीच वर्षांनंतर यांना हिंदुत्व आठवले ते कसे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपवाल्यांनी षडयंत्र आखून शिवसेनेला संपवण्याचा डाव आखला मात्र, तो कदापिही शक्य होणार नाही, असे ते म्हणाले.