
शिर्डी | शहर प्रतिनिधी
निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असतात मतांचा कोटा असतो, नसतो मात्र विधानपरिषदेच्या दोन्ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास मविआ सरकारमधील शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला असून राज्यात यंदा चांगली पर्जन्यवृष्टी होवू दे आणी या राज्यातील शेतकरीबांधव समाधानी राहू दे असे साकडे साईबाबांना घातले.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांना ईडीने काल दि.१४ रोजी समन्स बजावला आहेत. बुधवार दि.१५ जून रोजी परब यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र परब हे ईडी कार्यालयात हजर न राहता त्यांनी काल बुधवारी थेट शिर्डी साईदरबारी मध्यान्ह आरतीला हजेरी लावत श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी श्री साईबाबांच्या समाधीवर त्यांनी भगव्या रंगाची चादर टाकून श्री साई समाधीची पाद्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव तसेच श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन कोते यांच्या हस्ते परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, साईमंदिर प्रमुख रमेश चौधरी, उपशहर प्रमुख सुयोग सावकारे, विश्वजीत बागुल, अमोल गायके, काँग्रेसचे अमृत गायके आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईदर्शनानंतर ते म्हणाले की, मला ईडीची नोटीस पाठवली तेव्हा मी बाहेर होतो, शिर्डीनजीक दौरा असल्याने मी नेहमीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. किरीट सोमय्या यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते काही अधिकारी नाही, मला ज्या अधिकाऱ्यांना उत्तर द्यायचे ते मी देईल असेही त्यांनी म्हटले. राज्यसभेच्या निकालावरून त्यांनी बोलतांना सांगितले कि, निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असतात. विधानपरिषदेवर शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येणार असल्याचे सांगितले.