अहमदनगर (प्रतिनिधी) -

गत पंधरा वर्षापासून असलेला पाणी प्रश्न निवेदन देऊनही सुटत नसल्याने शिवसेना नगरसेवकाने आजपासून महापालिकेत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत

पाणी प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, अशी भूमिका नगरसेवक सचिन शिंदे यांनी घेतली आहे.

नगरमधील कल्याणरोड परिसराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत असून नागरी लोकवस्ती वाढत आहे. गत पंधरा वर्षापासून या भागात पाणी समस्या आहे. महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विविध आंदोलने, रस्ता रोको, पालिकेत नागरिकांसह पालिका प्रशासनाबरोबर पाणी प्रश्नाबाबत हजोरोवेळा चर्चा झाली. तरीसुद्धा पाणी प्रश्न सुटलेला नाही.

जोपर्यंत सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अनेकवेळा महापालिकेने पत्रव्यवहार करून दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही. त्यामुळे पालिकेवरचा आमचा विश्वास उडाला आहे.

पालिका संपूर्ण शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करते व कल्याण रोड भागालाच दहा बारा दिवसांनी पाणी पुरवठा का केला जातो? असा सवाल शिंदे यांनी प्रशासनाला केला आहे. या भागातील नागरिक 100 टक्के महापालिकेचा कर भरतात, तरीसुद्धा कल्याण रोड भागावर पाणी प्रश्नाबाबत अन्याय का केला जातो? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

टाकी तयार पण कोरडी ठाक

कल्याणरोड परिसरातील गणेशनगर येथे दहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधून तयार आहे. परंतू या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी सोडलेले नाही. त्यामुळे या भागामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई आहे. महापालिकेने गणेशनगर भागातील टाकीमध्ये पाणी पुरवठा करून सर्वभागाला पूर्णक्षमतेने पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी केली आहे.