संपर्कप्रमुख कोरगावकरांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार

मुंबईत होणार सविस्तर चर्चा
संपर्कप्रमुख कोरगावकरांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या शिवसेनेचे होत असलेले नुकसान केवळ संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकरांमुळे होत आहे व काही नगरसेवकांनी शिंदे गटाला दिलेल्या साथीमागेही केवळ हेच कारण आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे करण्यात आल्याचे समजते. या तक्रारींवर तसेच नगर जिल्हा शिवसेनेतील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मुंबईत येत्या एक-दोन दिवसांत नगरमधील काहीजणांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यस्तरीय शिवसेनेत फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात येऊन त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू करून शिवसेनेचे गावा-गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. या शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा शनिवारी (दि.23) शिर्डीला संपला.

यावेळी त्यांनी तेथे मार्गदर्शन केले व सेनेतून बाहेर पडलेल्यांवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर, नगरमधील युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, अशोक दहीफळे आदींसह काहींनी शिर्डीत त्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केवळ विक्रम राठोड यांच्याशी चर्चा केली व सर्वांना मंगळवारी मुंबईत येण्याचे सांगितल्याचे समजते.

या दोन-पाच मिनिटांच्या भेटीत विक्रम राठोड यांनी नगरमधील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसमवेत असल्याचा विश्वास त्यांना दिला. मात्र, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यामुळे होणार्‍या राजकीय त्रासाबद्दल तसेच शहरातील शिवसेनेचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाऊंच्या असलेल्या संपर्कामुळे शहर शिवसेनेत नाराजी आहे व यातूनच काही नगरसेवक व पदाधिकार्‍यांकडून शिंदे गटाची साथ दिली जात असल्याचे स्पष्ट केल्याचे समजते.

या तक्रारी ऐकल्यावर आवश्यक ते संघटनात्मक बदल करण्याचे सूतोवाच ठाकरेंनी केले. लवकरच कारवाई करू, पण मुंबईला या व मोठ्या साहेबांशीही (उद्धव ठाकरे) बोला, असे स्पष्ट केले व यासाठी मंगळवारी (26 जुलै) मुंबईला यावे, पण तसा निरोप देतो, असेही सांगितले तसेच यावेळी जिल्हा व शहर शिवसेनेतील घडामोडींचाही आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता नगरमधून काहीजण येत्या मंगळवारी वा एक-दोन दिवसात मुंबईला जाऊन आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहर शिवसेनेचे स्वतंत्र शिष्टमंड़ळ या आठवड्यात मुंबईला जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही समजते.

प्रतिज्ञापत्राची जबाबदारी

आदित्य ठाकरेंच्या शिर्डी दौर्‍याच्यावेळी नगर शहरातून कोणीही नगरसेवक गेले नसल्याचे समजते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करणारे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र भरून घेण्यास प्राधान्य दिले गेले असल्याने त्यात आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी व्यस्त झाले आहेत. त्यामुळे ठाकरेंनीही निवडक काही जणांनाच शिर्डीला बोलावले होते, असे सुत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com