आपले खासदार तोंडच उघडत नाहीत !

माजी मंत्री कर्डिले यांचा खा. विखे यांना नाव घेता घरचा आहेर
आपले खासदार तोंडच उघडत नाहीत !

करंजी |वार्ताहर| Karanji

जलजीवन मिशन ही योजना केंद्र सरकारची आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. राज्य सरकार सोयीनुसार या योजने संदर्भात केंद्र सरकारवर टीका करत असून कोट्यवधीचा निधी याच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मिळाला तर त्याचे श्रेय महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी घेत आहेत. यावेळी आपले खासदार तोंड का उघडत नाहीत? केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी दिल्या जाणार्‍या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात खासदार कमी पडत आहेत का ? असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नाव न घेता खा. डॉक्टर सुजय विखे यांच्यावरच निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथे शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयच्यावतीने आयोजित बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन रविवारी माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्डिले म्हणाले, राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे ऊर्जामंत्री आहेत, तरी देखील थकबाकीचे कारण पुढे करत शेतकर्‍यांच्या शेती पंपाचा वीजपुरवठा बंद केला जात आहे. दोन तास देखील पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. अनेक मोठ्या नळ पाणी योजना वीज बिल थकले म्हणून आठ-पंधरा दिवस बंद केल्या जात आहेत. मंत्रिपद कार्यकर्ते अधिकार्‍यांपुढे मिरवण्यापुरते आहे का? जनता दरबार घेऊन अधिकार्‍यांना वेठीस धरले जात आहे. या जनता दरबारातून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सोडवले याची जाहीर माहिती माध्यमांना द्यावी. जनता दरबाराचा फार्स केला जात आहे.

नगर-पाथर्डी तालुक्यातील 90 ते 95 टक्के सेवा संस्था भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांचा महाविकास आघाडी सरकारकडून मोठा भ्रमनिरास झाला असून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन नळपाणी योजनेअंतर्गत मोठा निधी मिळत असून त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे आमदार घेत आहेत.योजना केंद्र सरकारची असल्याने भाजपचे खासदार का गप्प ? केंद्र सरकारच्या योजनेमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असेल त्याचबरोबर गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असेल ते जनतेला सांगण्यात खासदार कमी पडत आहेत की काय? असा सवाल कर्डिले यांनी उपस्थित केला.

मंत्री तनपुरेंबरोबरच खा.विखेंवरही निशाणा साधल्याने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कुशल भापसे यांनी माजी आमदार बाबुराव भापसे, प्रमोद भापसे व आ. प्रसाद लाड यांच्या प्रेरणेने पाथर्डी तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत 14 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, 51 अनाथ मुलांचे बारावीपर्यंत मोफत शिक्षण असे राबवलेले समाजाभिमुख सामाजिक उपक्रम निश्चित कौतुकास पात्र असल्याचे माजी मंत्री कर्डिले यावेळी म्हणाले. यावेळी पुरुषोत्तम आठरे, चेअरमन बाळासाहेब लवांडे, माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे, धीरज मैड, पंकज मगर, नगरसेवक अण्णासाहेब भापसे, कुणाल भापसे, भास्कर पाठक, संतोष चोभे, भाऊसाहेब शेलार, चव्हाण, डॉ. नितीन ढमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.