मंत्री अथवा आमदारकी नसतानाही भाजपमध्ये कर्डिलेंचीच हवा !

केंंद्रासह राज्यातील पक्षाचे नेते कर्डिलेंच्या घरी
शिवाजी कर्डिले
शिवाजी कर्डिले

करंजी |वार्ताहर| Karanji

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले जिल्ह्यातील राजकारणातले एक बहुआयामी नेतृत्व आहे. त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची जिल्ह्यात देखील नेहमीच चर्चा असते. कर्डिले सध्या कोणत्याही मोठ्या पदावर नाहीत. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची मोठी पकड आहे. राजकारणात स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवणे देखील महत्त्वाचे असते आणि ते अगदी पद्धतशीरपणे टिकवण्याचे काम कर्डिले यांनी केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राहुरी मतदार संघातून त्यांना जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी मागील तीन वर्षांत त्यांनी मतदारसंघात सर्वसामान्य जनतेशी आपला संपर्क, भेटीगाठी कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघातही त्यांना कोणी माजी आमदार म्हणायला तयार नाही. इतकेच नव्हे तर भाजपच्या राज्य व केंद्रातील मंत्री व मोठ्या पदांवरील नेते मंडळींना आपलसं कसं करायचं हे कर्डिले यांना कोणी सांगण्याची गरज नाही. चार दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी देखील त्यांनी कर्डिले यांच्या निवासस्थानी अगोदर येऊन कौटुंबिक गप्पागोष्टी केल्या.

त्यानंतर दोन दिवसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नगर शहरामध्ये आले, त्यावेळी देखील त्यांनी बुर्‍हाणनगर येथे कर्डिले यांच्या निवासस्थानी पोहचले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील काही दिवसांपूर्वी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन गेले एवढेच नव्हे, तर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील कर्डिले यांच्या निवासस्थानी नेहमी वर्दळ सुरू असते.

एकंदरितच सत्तेत असो अथवा नसो कर्डिले सध्या आमदार नाहीत अथवा मंत्री नाहीत भाजपच्या मोठ्या कार्यकारिणीवर देखील नाहीत, परंतु अशक्याचे शक्य करून दाखवण्यात कर्डिले माहीर आहेत. त्यांचे राजकीय आडाखे, डावपेच आतापर्यंत अनेकांना समजलेले नाहीत. सध्या राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातही कार्यकर्त्यांमध्ये आपला नेता लईच भारी अशा शब्दांत चर्चा रंगत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com