
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची बैठक चालू असताना काळे कारखान्याचे संचालक शिवाजी घुले बैठकीसाठी जात असताना त्यांना वाटेतच अडवून गावातील तिघांनी त्यांच्यावर गज, हॉकी स्टिक व लाथा बुक्क्याने हल्ला करत त्यांना जखमी केले.
याबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये किशोर विजय कदम, निलेश सुधीर कदम व दत्तू गजानन कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा घेत गावकर्यांनी निषेध नोंदवला.
सोमवारी सायंकाळी राघवेश्वर मंदिराच्या परिसरात शिवरात्रीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठक सुरू होती. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवाजी माधव घुले मोटारसायकलवरून जात असताना त्यांना वाटेतच किशोर कदम, निलेश कदम व दत्तू कदम यांनी अडवले. तुझे मंदिरात काय काम आहे असे म्हणत त्यांनी घुले यांना खाली पाडून गज, हॉकी स्टिक व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत घुले जखमी झाले. झालेला प्रकार घुले यांनी गावकर्यांना सांगितला. डोक्याला व हाताच्या बोटांना दुखापत झाली होती.घुले यांना कोपरगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला. वरील आरोपीं विरोधात भादंवी कलम 324, 323, 341, 504, 586, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची माहिती दुसर्या दिवशी गावात समाजल्यानंतर नागरिकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. आरोपीं विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनकडे मागणी केली आहे. शिवाजी घुले यांच्यावर सध्या उपचार चालू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने समजते. पोलीस नाईक विलास कोकाटे पुढील तपास करीत आहेत.