कर्डिले यांचे शेतकऱ्यांविषयी प्रेम पुतणा मावशीचे

शिवसेना नेते गोविंद मोकाटे यांचा आरोप
कर्डिले यांचे शेतकऱ्यांविषयी प्रेम पुतणा मावशीचे

अहमदनगर (प्रतिनिधी)

ज्यांनी आयुष्यभर राजकीय जीवनात कटकारस्थाने करून निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकण्याचे पाप केले ते शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये कसे जाणार? शेतकऱ्यांविषयी त्यांचे प्रेम पुतणामावशीचे आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारे शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची अशोभनीय भाषा करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी केला.

जेऊर येथील महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करीत कर्डिले यांनी राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्यावेळी ते म्हणाले, जेऊर येथे कर्डिले यांनी केलेले आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आहे. तसेच दुसऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये पाठवणारे काय जेलमध्ये जाणार? ते जेलमध्ये नक्की जातील परंतु सामाजिक आंदोलनातून नव्हे तर त्यांच्या इतर कर्तृत्वाने जातील. सत्तेत असताना पंचवीस वर्षात मंत्रालयात शेतकऱ्यांबद्दल ब्र शब्द न उच्चारणाऱ्यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. दूधवाले आमदार म्हणून घेणाऱ्यांनी दुधाचा प्रश्न सोडविला का ? दूध प्रक्रियेचा एखादा उद्योग केला का? उलट दूध संघ बंद पाडला.

खोट्या गुन्ह्यात अडकवले

पांगरमल विषारी दारू प्रकरणात माझा व माझ्या मुलीचा काही एक संबंध नसताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यास कर्डिलेच जबाबदार असल्याचा आरोप मोकाटे यांनी केला. तसेच परिसरातील सर्व गावांनी दवंडी पिटवून सुद्धा जनतेचा यांच्यावर विश्वास राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे आंदोलनाचा फज्जा उडाला, असल्याची टीका मोकाटे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com