
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये डीजे सिस्टीम लावून सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अर्टी व शर्तीचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण केले. तसेच जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा तर तोफखाना पोलीस ठाण्यात तीन असे नऊ गुन्हे मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व डिजे मालकाविरूध्द दाखल करण्यात आले आहेत.
धर्मवीर संभाजी राजे युवा प्रतिष्ठान आदर्शनगर कल्याण रोड, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव, शिवबा प्रतिष्ठान मल्हार चौक रेल्वेस्टेशन, पैलवान प्रतिष्ठान माळीवाडा, माळीवाडा ग्रामस्थ माळीवाडा, साई संघर्ष युवा प्रतिष्ठान नालेगाव या सहा मंडळांचे अध्यक्ष, सदस्य व डिजे मालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 188, 34 सह पर्यावरण अधिनियम, ध्वनी प्रदूषण अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र गर्गे, योगेश खामकर, उमेश शेरकर यांनी फिर्यादी दिल्या आहेत.
शिवजयंती उत्सव समिती त्रिमूर्ती चौक पाईपलाईन रोड, साई संघर्ष प्रतिष्ठान पाईपलाईन रोड, जनता गॅरेज मित्रमंडळ सावेडी या तीन मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व डिजे मालकाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार अजय गव्हाणे, तनवीर शेख यांनी फिर्यादी दिल्या आहेत.