
अहमदनगर, श्रीरामपूर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त गावागावांत, शहरांमध्ये ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यात आले. तसेच ढोलताशांचा गजर, जय भवानी जय शिवाजी घोषणांनी जिल्हा दणाणून गेला होता. नगर जिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या तसेच श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, राहाता, देवळाली, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड पालिका व अन्य निवडणुका असल्याने या जयंतीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध कार्यक्रमासाठी रसद पुरविल्याचे दिसून आले. या निमित्ताने तरूणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.
श्रीरामपूर शहरात शिवजयंतीची सकाळपासूनच धूम सुरु होती. सर्वत्र भगव्या कमानी आणि झेंडे लावण्यात आल्याने शहर भगवामय झाले होते. सकाळी विविध संघटनांचे पदाधिकार्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल. छत्रपतींच्या जयंतीनिमित्त रक्तदान, निराधारांना मदत आणि किर्तन, पोवाड्याचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहरातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.