
शिरूर | तालुका प्रतिनिधि
शिक्रापूर (Shikrapur) (ता. शिरूर) येथून २६ फेब्रुवारी रोजी एक महिला व मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्या मायलेकींचे मृतदेह रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangoan MIDC police sation) हद्दीतील गणेगाव खालसा येथील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथील लता शिवाजी घोडे ही महिला मुलगी प्रगती घोडे या मुलीला क्लासला सोडायला म्हणून घराबाहेर गेली होती. मात्र, घरी परत आलीच नाही. त्यामुळे महिलेचे पती शिवाजी आबा घोडे (वय २९ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी पत्नी लता शिवाजी घोडे व मुलगी प्रगती शिवाजी घोडे या दोघी बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली होती.
याबाबतचा तपास शिक्रापूर पोलिस करत असताना रविवारी सकाळच्या सुमारास गणेगाव खालसा येथील शेतात अनिल थोरात हे शेतामध्ये काम करत होते. त्यांना शेतातील काम करत असताना त्यांना विहिरीमध्ये एक महिला व एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
त्यांनी तातडीने याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, सुभाष गारे, पोलिस हवालदार विजय सरजीने, संतोष औटी, सुनील नरके, वैभव मोरे, वैजनाथ नागरगोजे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग साबळे, हेमंत इनामे आदींनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली. येथील नवनाथ थोरात, अक्षय थोरात, विवेक थोरात, कुणाल गावडे, ईश्वर थोरात यांच्या मदतीने सदर विहिरीतील मृतदेह पाण्याबाहेर काढले.
दरम्यान, सदर मृतदेह शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील बेपत्ता लता शिवाजी घोडे (वय २८ वर्षे) व प्रगती शिवाजी घोडे (वय ६ वर्षे दोघे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांचे असल्याचे समोरआले. याबाबत अनिल बबन थोरात (वय ४५ वर्षे रा. वाघाळे ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे खबर दिली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, सदर घटनेबाबत काही माहिती मिळू शकली नाही.
सदर महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वैजनाथ नागरगोजे हे करत आहेत.