नेवासा : शिरसगावमध्ये आढळला करोनाचा रुग्ण

नेवासा : शिरसगावमध्ये आढळला करोनाचा रुग्ण

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या पूर्व भागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील 51 वर्षाच्या व्यक्तीला तीन दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने तो व्यक्ती नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. त्या व्यक्तीच्या घशातील स्त्राव घेऊन अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.

त्याचा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून आज गुरुवार 16 जुलै रोजी सायंकाळी आलेल्या अहवालात तो व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती नेवासाचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे.

नेवासा येथील कोविड केअर सेंटर मध्ये या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचे ही सुराणा यांनी सांगितले.

सदरचा अहवाल मिळताच तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांच्यासह शिरसगाव येथील वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी,मंडल अधिकारी, सरपंच तसेच इतर पदाधिकारी शिरसगाव येथे दाखल झाले आहेत.

हा रुग्ण शिरसगाव या ग्रामीण भागातील मोठ्या लोकसंख्येच्या गावातील आहे.तो गाव सोडून कुठेच बाहेर गेला नसल्याचे समजते. मग हा रुग्ण नेमका कोणाच्या सानिध्यात आला आणि बाधित झाला हे समजणे कठीण झालेले आहे.प्रशासन या मागील कारण शोधत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com