शिर्डी ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गावकरी दर्शनाची नियमावली उच्च न्यायालयात केली सादर
शिर्डी ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी एकिकडे शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करायच्या आणि मी तुमच्यासोबत आहे असे दाखवायचे,

दुसरीकडे ग्रामस्थांना पडद्याआड ठेवून गावकरी दर्शनासाठी असलेल्या जाचक अटींची नियमावली थेट उच्च न्यायालयात सादर करायची ही शिर्डीकरांची फसवणूक असून आम्ही या नियमावलीचा विरोध करत आहे. एखाद्या अधिकार्‍यांने चांगले काम केले तर त्यास डोक्यावर घेऊ परंतु चुकीचे काम करणार्‍यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून उत्तर देण्याची भूमिका शिर्डीकरांची कायम राहिल्याची स्पष्टोक्ती माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिली.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी शिर्डी ग्रामस्थ तसेच शिर्डी येथील पत्रकारांना जाचक अटीची नियमावली तयार करून थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली आहे. शिर्डी ग्रामस्थांना साईसमाधीचे सुलभ दर्शन मिळावे यासाठी समस्त शिर्डी ग्रामस्थांनी पुर्वीपासून चालू असलेल्या गावकरी गेटने दर्शन व्यवस्था करण्यात यावी तसेच साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक तीन व चार खुले करून देण्यात यावे अशा अन्य मागण्या केल्या होत्या.

याप्रश्नी सर्वप्रथम शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच खा. सदाशिव लोखंडे यांनी श्री. बगाटे यांची भेट घेतली होती. तरीदेखील याबाबत त्यांनी कोव्हिड नियमांची वेगवेगळी कारणे दाखवून यास विरोध दर्शवला होता.त्यानंतर ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिली असता त्यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करत सदरच्या मागण्या तत्वतः मान्य केल्या. ग्रामस्थ व पत्रकारांशी समन्वय करून संस्थानने सामंजस्याची भुमिका घेऊन सदरचे प्रश्न सोडवावे यासाठी शनिवारी शिर्डी ग्रामस्थांची विविध विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान अनेक विषयांवर ग्रामस्थांचे एकमत झाल्यानंतर रविवारी दुपारी ग्रामस्थांच्या प्रमुख नेत्यांबरोबर पत्रकारांची बैठक पार पडली

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, अशोक कोते, ताराचंद कोते आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ एकनाथ गोंदकर यांनी सांगितले की शिर्डी ग्रामस्थ हा फक्त प्रदर्शनासाठी साई मंदिरात येत नसून तो त्याचा दैनंदिन व्यवसाय सांभाळून दहा मिनिटे दर्शन कसे होऊन बाहेर पडतील ही त्याची प्रामाणिकपणे भूमिका असते.

त्यादृष्टीने ग्रामस्थांची मागणी बगाटे यांनी मान्य केली, म्हणून आम्हाला दिलासा मिळाला परंतु ज्या वेळेस ग्रामस्थांच्या दर्शनासाठी संस्थांनने थेट उच्च न्यायालयात सादर केल्याने सत्त्व पुढे आले. त्यामुळे आम्हालाही न्यायालयात जावे लागणार आहे. यास आमचा विरोध आहे. त्याचबरोबर पत्रकारांना देखील जाचक अटी संदर्भात नियमावली तयार केल्याने चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.. सामंजस्याने

प्रश्न मिटवावे ही आमची भूमिका आजही आहे. संस्थांनने घेतलेली भूमिका अत्यंत चुकीचे असून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे 12 फेब्रुवारीपर्यंत सुट्टीवर असल्याने उच्च न्यायालयाची सुनावणी 10 फेब्रुवारीला आहे, त्यामुळे संबंधित प्रश्न कसे सोडायचे हा यक्षप्रश्न शिर्डी ग्रामस्था समोर उपस्थित झाला आहे. आमची भूमिका संस्थान अधिकार्‍यांना मान्य नसेल तर आम्हालाही कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल.

ग्रामस्थांची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला असून ज्यावेळेस संस्थांनावर वाईट काळात त्याचप्रमाणे पाण्याचे मोठे संकट उभे राहिले त्या त्या वेळी शिर्डीकर मदतीला धावून आले, असे असताना कालचा आलेला अधिकारी जराशा विचित्र पद्धतीने शिर्डी ग्रामस्थांशी वागत असेल तर त्या अतिशय निंदनीय असल्याचे डॉ गोंदकर यांनी सांगितले.

पत्रकारावर गुन्हा

साईबाबा संस्थान आणी पत्रकारांमधील वाद विकोपाला पोहचला असून दि. 16 नोव्हेंबर रोजी साईमंदीर परिसरात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने तब्बल अडिच महिण्यानंतर साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

रवींद्र ठाकरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीचे पत्रकारांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी की साईसंस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारदारीत म्हटले आहे की दि.16 नोव्हेंबर

2020 रोजी साईमंदीर खुले करण्यात आले होते.त्यादिवशी सकाळी साईमंदीर परिसरात अनेक वृत्तवाहिनीची पत्रकार उपस्थित होते. दरम्यान यावेळी चित्रीकरण करत असताना एका खाजगी वृत्तवाहिनी च्या पत्रकारांंनी कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याने तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने संबंधित वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर रविवार दि.31 रोजी सायंकाळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तक्रार दाखल केली असून संबधित तिघा पत्रकारांवर

गु.र.नं. 15/120 भादवी कलम 353, 188 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान शिर्डी शहरात याप्रकरणी मोठी चर्चा सुरू असून संबधीत वृत्तवाहिनीने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसारित केल्याने याचा राग मनात धरून सदर पत्रकरांवर तब्बल अडीच महिण्यांनी गुन्हा दाखल केला असल्याचे बोलले जात आहे.

मागणी मान्य केली म्हणून सत्कार करणार्‍या ग्रामस्थांना आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला

शिर्डी ग्रामस्थांना साईसमाधीचे सुलभ दर्शन मिळावे यासाठी समस्त शिर्डी ग्रामस्थांनी पुर्वीपासून चालू असलेल्या गावकरी गेटने दर्शन व्यवस्था करण्यात यावी तसेच साईमंदीर प्रवेशद्वार क्रमांक तीन व चार खुले करून देण्यात यावे अशा अन्य मागण्या शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांनी मान्य केल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा अभिनंदनाचा ठराव करून त्यांचा सत्कार करण्याचा ठराव केला होता. मात्र अचानक त्यांनी ग्रामस्थांच्या दर्शनाबाबतची नियमावली उच्च न्यायालयात सादर करून फसवणूक केली म्हणून ग्रामस्थ पुन्हा संस्थानच्या अशा अधिकार्‍यांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात उभे ठाकले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com