
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिर्डी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने अपर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, लघुलेखक (निम्नश्रेणी) व अव्वल कारकुन अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि लिपिक टंकलेखकाची दोन पदे अशा एकूण सहा पदांना मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश उप सचिव संतोष गावडे यांनी काल (बुधवारी) काढले आहेत.
जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 13 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे.
तर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, नगर कार्यक्षेत्रात नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांचा समावेश असणार आहे. शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने अपर जिल्हाधिकारी, नायब तहसिलदार, लघुलेखक (निम्नश्रेणी), अव्वल कारकुन अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि लिपिक टंकलेखकाची दोन पदे अशा एकूण सहा पदांना काल मान्यता दिली. या निर्णयामुळे शिर्डी कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामकाजासाठी स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालय उपलब्ध झाले आहे. यामुळे शासकीय काम अधिक गतिमान होणार आहे.