शिर्डीत बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

शिर्डीत बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरात नाताळनिमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशातील साईभक्तांची गर्दी होत असून काल रविवार दि. 26 रोजी जुन्या पिपळवाडी रोडलगत असलेल्या दर्शन रांगेजवळ बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी बाँम्बशोधक पथक दाखल होऊन तपासणी केल्यानंतर सदर बॅगेत काही आढळले नाही. त्यामुळे साईभक्तांनी सुटकेचा श्वास सोडला.

नाताळच्या सुट्टीत देशविदेशातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील साईभक्त साईदरबारी हजेरी लावून नतमस्तक होत असतात. काल रविवारी सकाळी पिंपळवाडी रोडलगत असलेल्या दर्श नरांगेजवळ एक बेवारस बॅग आढळून आल्यानंतर साईभक्तांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.

याची चर्चा वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी साईसंस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच पोलीस आणि बाँम्बशोधक पथक दाखल झाले होते. बॉम्बशोधक पथकाने या बेवारस बॅगची तपासणी केल्यानंतर बॅगच्या आतमध्ये काहीही आढळून न आल्याने उपस्थित पोलीस, साईभक्तांसह ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आणि पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण झाली. या बेवारस बॅगची शिर्डीत व साई भक्तांमध्ये दिवसभर चर्चा रंगली होती. काही काळ साईभक्तांंमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.

शिर्डीत साईभक्तांची गर्दी वाढत असल्याने पोलीस कुमक वाढविण्यात आली आहे. शिर्डीतील ग्रामस्थ तसेच साईभक्तांनी शांतता पाळावी, विनाकारण गर्दी करू नये, मास्क वापरावे, करोनाच्या अटी व शर्तींचे पालन करावे, असे आवाहान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com