शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे आस्थापनेत घेण्यात आलेले 598 कुशल-अकुशल कायम कंत्राटी कर्मचार्यांना देण्यात आलेले

नियुक्ती आदेश अवघ्या अकरा महिन्यांत तदर्थ समितीच्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2020 पासून रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश शनिवार 21 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिले.

साईबाबा संस्थांच्या कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या सन 2001 ते 2004 पर्यंतच्या कामावर असलेल्या 635 कामगारांना शासनाच्या वतीने साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून मंजुरी देण्यात आली होती. नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी साईबाबा संस्थानच्यावतीने संस्थानच्या सेवेत सामावून घेण्याच्या ऑर्डर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याहस्ते देण्यात आल्या होत्या.

यामुळे सेवेत सामावून घेण्यात येणार्या 598 कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले होते. मात्र तदर्थ समितीचे दि. 13 जुलै 2020 व 28 ऑगस्ट 2020 रोजीचे सभेतील साईबाबा संस्थान आस्थापनेवरील कायम कंत्राटी कामगारांच्या सेवा पुन्हा कंत्राटदाराकडे वर्ग करणे आवश्यक असल्याचा आदेश करण्यात आला होता.

त्यानुसार 598 कायम कंत्राटी कर्मचार्यांना दि. 2 जानेवारी 2020 मध्ये देण्यात आलेल्या नियुक्ती आदेशापूर्वी ज्या कंत्राटदाराकडे कार्यरत होते त्या कंत्राटदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी काढले असून या आदेशाची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या अकरा महिन्यांत कायम कंत्राटी वरून पुन्हा कंत्राटी कामगार म्हणून वर्ग करण्यासाठी झालेल्या निर्णयावर सर्व कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.