शिर्डीचे साईबाबा संस्थान राष्ट्रवादीकडे

शिर्डीचे साईबाबा संस्थान राष्ट्रवादीकडे

अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे ?

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

संपूर्ण विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार्‍या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला असून साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. उपाध्यक्ष शिवसेनेकडे राहाणार आहे. आज सतरा विश्वस्तांची यादी उच्च न्यायालयात जाहीर होण्याची दाट शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे.

आंतरराष्ट्रीय देवस्थान म्हणून नावारूपास आलेल्या तसेच देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र काल महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला शिर्डी संस्थान आले आहे तर काँग्रेसकडे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट. त्यामुळे उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती आज होणार आहे.

काल सायंकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष वगळता तिनही पक्षांचे प्रत्येकी पाच सदस्य असणार असून अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित कदम, अनुराधा आदिक, पांडुरंग अभंग, संग्राम कोते,संदीप वर्पे यांची नावे अग्रस्थानी आहेत तर शिवसेनेकडून रवींद्र मिर्लेकर, संगीता चव्हाण, संजय दुसाणे, रावसाहेब खेवरे आदी नावे चर्चेत आहे. काँग्रेसचे डॉ.एकनाथ गोंदकर, सत्यजित तांबे, करण ससाणे आदी नेत्यांची नावे आहेत. आज उच्च न्यायालयात सुनावणी असून संस्थानच्या विश्वस्तपदाचा तिढा कायमस्वरूपी सुटणार आहे.विश्वस्त मंडळ नियुक्तीनंतर संस्थानचा गाडा सुरळीत चालणार आहे.त्यामुळे शिर्डीत तसेच परिसरातील ब्रेक लागलेली विकासकामांना गती प्राप्त होईल.

दरम्यान, 22 जूनपर्यंत विश्वस्त मंडळ सरकारला नेमावे लागणार होते. पण सुनावणी आज बुधवारी होत असल्याने महाआघाडीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये पदाधिकारी आणि विश्वस्त नेमण्याबाबत रात्री उशीरापर्यंत खल सुरू होता. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु होती. अखेर शिर्डीचे साईबाबा संस्थान आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. नावांची यादी आज न्यायालयात सादर केल्यानंतर अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे.

विश्वस्त मंडळातील 17 जागांसाठी ही निवड होत असून विश्वस्त मंडळ निवडताना तीनही पक्षांच्या नेत्यांना नियमावली सुद्धा लक्षात घ्यावी लागली. कारण विश्वस्त पदी येणार्‍या व्यक्तीवर कोणतेही गुन्हे दाखल नसावेत व तो साईबाबा भक्त मंडळाचा आजीवन सदस्य असणे नियमावली नुसार गरजेचे आहे तर या व्यतिरिक्त अजून ही नियम आहेत. जर सरकारने नियमावली विरोधात व्यक्तींची निवड केली तर नवीन विश्वस्त मंडळ पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकेल यासाठी इच्छुक नावांवर रात्री उशीरापर्यंत खल सुरू होता. यात साईबाबा नेमके कुणाला पावतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

पंढरपूर देवस्थानची काँग्रेसकडे जबाबदारी

शिर्डीचे साईबाबा संस्थान राष्ट्रवादीकडे गेल्याने लाखो वारकर्‍यांचे श्रध्दास्थान असलेले पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची काँग्रेसकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळात नगर जिल्ह्यातील कुणाची वर्णी लागते याकडे नगरकरांच्या नजरा आहेत.

शिर्डीतील स्थानिकांना मिळणार का संधी

साईबाबा विश्वस्त मंडळात शिर्डीतील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी शहरातील सामाजिक व राजकीय नेते मंडळींनी जोर धरला होता. मात्र या नूतन विश्वस्त मंडळात स्थानिक ग्रामस्थांना संधी मिळते का याकडे लाखो साईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com