शिडी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षततेसाठी साईमंदिर परिसरात 26 जानेवारीपासून

टुरिझम पोलिस आऊटपोस्ट कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी दिली.

येथील नवीन पोलिस स्टेशन इमारतीचे हस्तांतरण दि. 26 जानेवारीला होणार असून, त्याची पाहणी करण्यासाठी जैस्वाल हे शिर्डीत आले होते. दरम्यान, साई दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी जैस्वाल म्हणाले की, शिर्डीमधून महिला बेपत्ता होण्याची संख्या वाढली आहे. यादृष्टीने पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. मंदिर परिसरात होणार्या चोर्या तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी टुरिझम पोलिस आऊटपोस्ट सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी साईबाबा ट्रस्टचे पदाधिकारी व अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये विविध राज्यातून भाविक येतात. त्यामुळे त्यांना भाषेचा मोठा प्रश्न येतो. यासाठी विविध भाषांची जाण असलेल्या व्यक्तींची या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे. भाविकांचे मोबाईल चोरांना आळा घालण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

शिर्डी येथे पोलिस कर्मचार्यांची संख्याबळ कमी आहे. हे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघाबकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने याठिकाणी गुर्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतच असून भाविकांची वाढती संख्या, त्यावर नियंत्रण व सुरक्षा प्रदान करताना शिर्डी पोलिस स्टेशनची चांगलीच दमछाक होते आहे. अशातच शिर्डीमध्ये नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून याबरोबर पोलिस कर्मचार्यांच्या वसाहत इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आहे. या इमारतीचे हस्तांतरण दि. 26 जानेबारी 2021 ला होणार आहे. साई समाधी दर्शनानंतर नवीन पोलिस स्टेशन इमारत व वसाहत इमारतीची पाहणी जैस्वाल यांनी केली.

खुद्द पोलिस महासंचालक शिर्डीत असताना सुद्धा शिर्डी मंदिर परिसरात अनेक रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हल, शनी शिंगणापूरच्या अवैध प्रवासी गाड्या उभ्या होत्या. चलो शिंगणापूर अशा आरोळ्या देत एजंट भाविकांना त्या गाड्यांमध्ये बसवत होते, हे सर्व दृष्य वाहतूक शाखेचे कर्मचारी चुप्पी साधून बघत होते. पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत हे दृष्य अनुभवणार्या भाविकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सलग येणार्या सुट्ट्यांमुळे साईंच्या शिर्डीत देशातील भाविकांची गर्दी झाली आहे. परंतु दर्शनाची गैरसोय होऊ नवे म्हणून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुजी बगाटे यांनी उत्कृष्ट नियमावली केली आहे. त्याची काटेकोर अंमलबजाबणी होत आहे.