शिर्डी बिरोबाबन विरभद्र मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी

शिर्डी बिरोबाबन विरभद्र मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नजीक बिरोबाबन येथील विरभद्र महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरून नेल्या तसेच कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. या मंदिरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे आव्हानात्मक झाले आहे.

मंदिरातील चांदीच्या पादुका चोरी प्रकरणामुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असून विरभद्र मंदिर हे पंचक्रोशीतील अराध्य दैवत आहे. या चोरीचा शोध पोलिसांनी तात्काळ लावावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. मंदिराचे पुजारी हरिभाऊ भगत यांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री एक ते दिडच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून मंदिरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मंदिराचे पुढील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व विरभद्र मंदिरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून नंतर मधील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला.

मंदिरातील दानपेटीचे कुलूप न तुटल्याने त्यांनी मंदिरासमोरील दीड किलो चांदीच्या पादुका चोरून नेल्या असल्याचे सांगितले आहे. बिरोबाबन येथील भाविकांनी या घटनेची माहिती देताच शिर्डी पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे. अशा विकृत मानसिकतेचा पोलिसांनी तपास करून कारवाई करावी, अशी मागणी नानासाहेब काटकर, संपत जाधव, रमेश बनकर, प्रवीण बनकर, संदीप बनकर, संदप काटकर, विकास धुळसैंदर, बाळासाहेब काटकर, चेतन बनकर, तसेच विरभद्र भगत हरी बनकर आदीसह शिर्डीसह पंचक्रोशीतील विरभद्र भाविकांनी केली आहे.

राहाता येथे मागील वर्षी वीरभद्र देवस्थानचा चांदीचा मुकुट व इतर वस्तुंची चोरी झाली होती. राहाता पोलिसांनी अवघ्या चार ते पाच दिवसांत चोरांचा शोध लावून त्यांना अटक केली होती. अशाच प्रकारे शिर्डी पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याचा शोध लावावा अशी मागणी भाविकांनकडून केली जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com