शिर्डीतील ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

2 बुलडोझर, 4 पोकलेन, 3 जेसीबी, 11 पथके व 100 कर्मचार्‍यांचा मोहिमेत सहभाग
शिर्डीतील ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत अतिवृष्टीमुळे निर्माण होत असलेली पूर परिस्थिती कायमची दूर करण्याकरिता ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून महसूल, नगपंचायत, साईबाबा संस्थान तसेच विविध शासकीय विभागाने ओढ्यावरील असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम जलदगतीने हाती घेतल्याने भविष्यात अतिवृष्टी झाली तरी शिर्डीत पाणी घुसणार नाही, याकरिता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शिर्डीला पावसाच्या पाण्याने वेढा दिला होता. अनेक उपनगरांत अजूनही पाणी साठल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. अनेकांच्या घर, दुकाने तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

त्यादृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, भूमी अभिलेख, जलसंपादन, जलसंधारण, जलनिःस्सारण या शासकीय विभागासह साईबाबा संस्थानच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी 2 बुलडोझर, 4 पोकलेन, 4 जेसीबी, 11 पथके, 100 अधिकारी व कर्मचारी या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत सहभागी आहेत. भूमी अभिलेख विभागामार्फत या ओढ्याचे मोजणीचे काम सुरू आहे. ओढ्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मूळचा ओढा नावारूपाला येणार आहे.

साईबाबा संस्थान या यंत्रसामुग्रीला डिझेल देणार आहे. तसेच या ओढ्यावरील निघणारा गाळ समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी वापरला जाणार आहे. परिसरातील नागरिकांना या ओढ्यावरील निघणारा गाळ घेऊन जायचा असेल तर त्यांनी आपल्या वाहनातून घेऊन जावा, असे महसूल विभागाने सांगितले आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून ओढ्यावरील असलेले अतिक्रमण काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना जाण्या-येण्यासाठी अडचण होत आहे, त्याठिकाणी पूल बांधण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. ना. विखे पाटील यांचे या कामावर बारकाईने लक्ष असून ते दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत आहेत. या ओढ्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. तरीही पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे नुकसान होणार नाही, ही खबरदारी घेण्याकरिता सर्व शासकीय विभाग तसेच साई संस्थानच्या मदतीने हे काम सुरू आहे.

- कुंदन हिरे, तहसीलदार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com