
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिर्डीला समृध्दी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्यातील 18 ते 20 जिल्हे जोडले गेलेले आहेत. तसेच रेल्वेमुळे मुंबई, पुण्याचे अंतर कमी झालेले आहे. यासह शिर्डीत राहण्याची मुबलक सोय उपलब्ध असून सोबत साई दर्शनही घेता येईल, यामुळे राज्यातील सर्वात मोठे पशु प्रदर्शन (महापशुधन एक्सपो) शिर्डी भरण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 24 ते 26 मार्च दरम्यान हे प्रदर्शन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत खा. डॉ. विखे बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर आदी उपस्थित होते. शिर्डीतील हे पशुधन प्रदर्शन राज्यस्तरीय असून ते भव्यदिव्य करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी आतापासून कामाला सुरूवात करण्याच्या सुचना खा. विखे यांनी दिल्या.
लम्पी रोगानंतर पशूसंवर्धन विभागाच्या मर्यादा समोर आल्या. यामुळे पहिल्यांदा राज्यात पशूसंवर्धन विभागाचे नूतणीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनापूर्वी जिल्ह्यातील पशूपालक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात पशूपालक म्हणजे दररोज पशूधनाची निगा राखणार पाहिजे, असे खा. विखे यांनी आर्वजून सांगितले.
संबंधीत पशूपालकांच्या जनावरांचे झालेले लसीकरण याची माहिती, होणारे दुधाचे उत्पादन आणि संबंधीत पशूपालकांचा संपर्काचा नंबर घेण्याच्या सुचना बैठक देण्यात आल्या. नगर जिल्ह्याचा केंद्राच्या पशूसंवर्धन विभागाच्या योजनेत समावेश करण्यात आला असून यामुळे सर्वेक्षणातून तयार होणार्या डेटाच्या आधारे पशूपालकांच्या विकासासाठी 30 ते 40 कोटींचे अनुदान उपलब्ध करण्याचा मानस खा. विखे यांनी यावेळी बोलून दाखवला.
येत्या 24 ते 26 मार्चदरम्यान शिर्डीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती राज्यस्तरीय महापशूधन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या एक्स्पोत सुमारे 10 लाख पशूपालक हजेरी लावणार असून किमान 1 हजार 500 वेगळी जनावरे सहभागी होणार आहेत. 35 एकराच्या आवारात हा एक्सपो होणार असून यात वेगवेगळ्या जाती गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांचा समावेश राहणार आहे. ऐक्सपोसाठी तालुकानिहाय टीम तयार करण्यात येणार असल्याचे खा. विखे यांनी सांगितले.
यासाठी आधीच तारिख सांगितली
पुढील महिन्यांत 24 ते 26 मार्चला होणार्या ऐक्सपोची तारीख आधीच सांगितली आहे. यामुळे अधिकार्यांनी या कालावधी लग्न समारंभ आयोजित करून नयेत, ती शक्यतो पुढे ढकलावीत, अशी तंबीच खा. विखे अधिकार्यांना दिली. तसेच ऐक्सपो भव्य करण्यासाठी सर्वांनी सुचना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाघ आणि अस्वल आणावयाचे होते...पण
शिर्डीच्या ऐक्सपोमध्ये जनावरांसह वाघ, अस्वल आणि अन्य प्राणी आणण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्यासाठी वन विभागाची परवागी आवश्यक आहे. यामुळे प्रदर्शनात वाघ आणि अस्वल यांना आणता येणार नसल्याची खंत खा. डॉ. विखे यांनी बोलून दखवली.
यापुढे पशुसंवर्धनचे फिरते दवाखाने
नगरसह राज्यात यापुढे पशुसंवर्धन विभागाचे फिरते पशुचिकित्सालय राहणार आहे. यासाठी विजेवर चालणारी वाहने घेण्यात येणार असून त्याव्दारे पशुपालकांच्या दारात जाऊन त्याच्या पशुधनावर उपचार करण्यात येणार आहेत. या विजेच्या वाहनांच्या किलो मीटरच्या नोंदीचा विषय नसल्याने जनावरांच्या डॉक्टरांनी एखाद्या लग्न कार्यालयात ते वाहन नेले तरी हरकत नसल्याचे विखे म्हणताच हशा पिकला.