शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरात मकरसंक्रांतीच्या पुर्वसंध्येला साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केल्याने

बायोमेट्रिक दर्शन पासेससाठी हजारो भाविकांना सलग चार तास रांगेत उभे राहावे लागल्यामुळे संतप्त झालेल्या भाविकांनी साईबाबा संस्थान प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. एकंदरीतच गर्दीमुळे नियोजन ढासळल्याने साई संस्थानचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले आहे.

दरम्यान गुरूवार तसेच मकर संक्रातीच्या सुट्टीनिम्मीत्त सायंकाळ पासूनच शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली. साईमंदीरात दर्शनाला जाण्यासाठी आँनलाईन व्यतिरिक्त ऑफलाईन दर्शनासाठी बायोमेट्रीक पासेस घ्यावे लागतात त्यासाठी काही ठिकाणी काऊंटर सुरु केले असून साई संस्थानने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या श्रीराम पार्कींग परीसरात मोठी गर्दी होत असून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी केवळ चार पासेस काऊंटर सुरु आहे. त्यातच काल संक्रांतीच्या दिवशी भाविकांची गर्दी वाढल्याने येथे बायोमेट्रिक काऊंटर पासेस घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसुन आले.

त्यामुळे भाविकांचा मोठा गोंधळ उडाला असून पहाटे पासुन पासेससाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान भक्तांना पासेस घेण्यासाठी चार तास प्रतिक्षा करावी लागल्याची तक्रार भाविकांनी केली आहे. पुर्वीही शिर्डीत गर्दी होत होती, मात्र भक्तांना थेट दर्शन रांगेत सोडले जात होते.

गेल्या काही वर्षापासुन प्रत्येक भक्तांला साई संस्थानने बायोमेट्रीक पास घेण्याची सक्ती केल्यामुळे भक्ताला काही तास आधीच पास काढण्यासाठी थांबावे लागते. त्यानंतर पुन्हा दर्शन रांगेत उभे रहावे लागत असल्याने भक्तांची सुविधा होण्याऐवजी त्रासच होत आहे. त्यामुळे भक्तांच्या सुविधेसाठी दर्शन पासेस वितरण काऊंटर वाढविण्याची साईभक्त आणि ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

मंदीरात साईभक्त गेल्यानंतर त्याठिकाणी शांततेत दर्शन कोवीड नियमामुळे मिळत आहे. दोन भक्तांंमध्ये अंतर पाळेल जाते, मात्र मंदीर परीसराच्या बाहेर अंतर ठेवल जात नसल्याने करोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसुन येत आहे.

साईबाबा संस्थान शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत आहे, परंतु सदर नियोजन करीत असताना साईभक्तांचा ओघ शिर्डीच्या दिशेने दिसून येत आहे. अशाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करून संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी हा पेच सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. साईभक्त आहे म्हणून आपण सर्वजण आहोत. याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. गर्दी झाली तर पंढरपूर देवस्थानप्रमाणे बायोमेट्रिक दर्शन पासेस बंद करून थेट दर्शन रांगेत भाविकांना प्रवेश द्यावा.
- निलेश कोते, मा. उपनगराध्यक्ष शिर्डी न.पं.