शिर्डीत श्रीलक्ष्मीपूजन

शिर्डीत श्रीलक्ष्मीपूजन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सव साजरा करण्यात आला असून श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्या हस्ते लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दीपावली श्रीलक्ष्मीपूजन उत्सव साजरा करण्यात आला. दिपावलीनिमित्त आज सायंकाळी 5 ते 6 यावेळेत समाधी मंदिराच्या गाभार्‍यात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले. याप्रसंगी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, सौ.मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री दिलीप उगले, कैलास खराडे, संजय जोरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी 06.00 वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात आली. तर रात्रौ 10.00 वाजता श्रींची शेजारती झाली.

तसेच दिपावली निमित्त संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. या दिपावली उत्सवानिमित्त कानपुर येथील साईभक्त श्रीमती कविता कोटवाणी कपुर व शनि शिंगणापूर येथील गणेश शेटे, शनेश्वर डेकोरेर्टस यांच्या वतीने देणगीस्वरुपात विद्युत रोषणाई व बेंगलोर येथील देणगीदार साईभक्त श्री.आर.पंचपाकेसन यांच्या देणगीतुन श्री साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com