शिर्डीत एकाच कुटुंबातील 9 जण करोना पॉझिटिव्ह
सार्वमत

शिर्डीत एकाच कुटुंबातील 9 जण करोना पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डी शहरात दोन दिवसांत तब्बल 16 जणांना करोनाची बाधा झाली असून काल बुधवार दि. 15 रोजी शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आत्तापर्यंत शहरात करोनाग्रस्तांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली असल्याने प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे.

शिर्डी शहरात मंगळवारी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपल्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये पाठविले होते. 27 पैकी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदरचे नऊ व्यक्ती शिर्डीतील व्यापारी कुटुंबातील असल्याचे नगरपंचायतचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले यांनी सांगितले.

या 9 बाधितांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू करण्यात आला असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या स्रावाचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. शहरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी शिर्डीत जोर धरू लागली असून त्यामुळे करोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

शहरात दररोज करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ही साखळी तोडण्यासाठी विनाकारण बाहेर न पडता घरी बसून राहणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवाहन देखील करण्यात येत आहे.

एकंदरितच सर्व करोना बाधित व्यक्ती व्यापारी वर्गातील असल्याने त्यांच्या संपर्कात अनेकजण आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात असून बाधित व्यक्तींनी आपण कोणाच्या संपर्कात आलो आहे, हे स्वतःहून प्रशासनाला कळविले तर करोनाची साखळी तुटली नाहीतर एकापाठोपाठ एक रुग्ण वाढतच जाईल, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सावळीविहीर येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडला

सावळीविहीर|वार्ताहर|Savlivihir

राहाता तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना मोठी बाजारपेठ असलेले सावळीविहीर गाव त्याला अपवाद ठरले होते. मात्र काल दुपारी नगर-मनमाड रोड लगत सोमैयानगरमध्ये एका 42 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा संपूर्ण भाग सील करण्यात आला असून संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वॉरंटाईन केले असून त्यांचे स्राव तपासणीसाठी नगर सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याचे सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर गागरे यांनी सांगितले.

दरम्यान सरपंच रुपाली संतोष आगलावे यांनी नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता आपापल्या घरात थांबावे. कोणीही गावात विनाकारण फिरू नये, असे आवाहन केले आहे. गाव संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तरी सर्वानी प्रशासनाला सहकार्य करावे, असे राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे, पोलीस पाटील संगीता वाघमारे, ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे, तलाठी गायके यांनी केले आहे.

करंजीत 34 वर्षीय महिला करोना संक्रमित

कोपरगावात दोन रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक 34 वर्षीय महिला करोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. तालुका प्रशासनाने तातडीने करंजी गावात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.

सुरेगाव येथील रहिवासी असलेल्या एका इसमास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी हाती आली होती. या कुटुंबात चार भाऊ, त्यांच्या पत्नी, आई, वडिल असा परिवार आहे. संशयितांच्या यादीत असल्याचा अंदाज खरा ठरला असून या कुटुंबासह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 17 जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्यांना शहरातील विलगीकरण कक्षात पाठविले.

त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असतानाच रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास करंजी येथील वैजापूर रस्त्यालगत नऊ चारी परिसरातील परजणे वस्ती शाळेच्या परिसरात असलेल्या या महिलेचा अहवाल करोना बाधित आल्याने पुन्हा एकदा करोनाचा कहर तालुक्यात झाल्याचे उघड झाले.

तालुक्यात सक्रिय असलेले दोन करोना रुग्ण बाधित झाले आहे. ही महिला कोपरगाव आधी वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात रविवारी उपचार घेत होती. त्यानंतर शस्रक्रिया करणासाठी कोपरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती झाली होती. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी या महिलेची शस्रक्रिया करण्यापूर्वी करोना चाचणी करण्याचा आग्रह धरल्याने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी प्रयोग शाळेत पाठवला होता.

तो अहवाल रात्री उशिरा मिळाला आहे. प्रशासनाने त्यांच्या घरातील दोन भाऊ.त्यांच्या पत्नी, मुले आदी सहा जणांची कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे. तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींनी करंजीकडे धाव घेऊन उशिरापर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या.

Deshdoot
www.deshdoot.com