शिर्डीत 8 तर संगमनेरमध्ये 20 करोना बाधित

आजपासून शिर्डी शहरात दहा दिवस ‘लॉकडाऊन’
शिर्डीत 8 तर संगमनेरमध्ये 20 करोना बाधित

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

शिर्डी शहरात आज तिसर्‍या दिवशी बाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली असून गेल्या तीन दिवसांत 24 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान काल गुरुवारी त्यामध्ये 8 नवीन बाधित रुग्णांची भर पडली असून शिर्डीत आजपासून नागरिकांच्या मागणीनुसार पुढील दहा दिवस शिर्डीत लॉकडाऊन राहणार असल्याचे नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले.

करोना व्हायरसमुळे देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तर त्याअगोदर शिर्डी शहरात 17 मार्चपासून साईबाबा मंदिर बंद झाल्याने बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी खबरदारी म्हणून शिर्डीकरांनी घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह होता. त्यामुळेच लॉकडाऊनच्या दोन महिने करोना व्हायरसने साईनगरीची सिमा ओलांडली नाही. मात्र त्यानंतर एका भाजी विक्रेत्या महिलेच्या संपर्कामुळे दोन बाधित रुग्ण शिर्डीत आढळून आले आणि बघता बघता शहरात करोनाचा शिरकाव झाला.

मागील काळात एखादा बाधित रुग्ण आढळून येत होता. आठवड्यापूर्वी एकूण सात बाधित रुग्ण शहरात होते. मात्र सलग तीन दिवसांत करोनाचा कहरच पाहावयास मिळाला असून मंगळवारी दि. 14 रोजी एकाच कुटुंबातील 07 बाधित रुग्ण मिळून आले तर बुधवार दि.08 रोजी 09 बाधित आणि काल गुरुवार रोजी 08 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

काल प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पटेल कॉलनी 01 , पिंपळवाडी रोड लोढा कॉलनी 04 , हेडगेवारनगर 01, आणि घरकाम करणार्‍या महिलेसह तिचा मुलगा असे एकूण 08 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.गेल्या दोन दिवसांत बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 30 जणांना संस्थानच्या साईआश्रम येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याचे नगरपंचायतचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले यांनी सांगितले आहे.

दिवसेंदिवस बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यूची मागणी केल्याने शिर्डी नगरपंचायतने आज दि. 17 जुलैपासून पुढील दहा दिवस शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यादरम्यान सकाळी 09 ते दुपारी 02 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. इतर आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. दुपारी 02 नंतर संपूर्ण शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याचं शिर्डी नगरपंचायतच्यावतीने सांगण्यात आलेे आहे.

संगमनेर तालुक्यात नव्याने 20 करोना बाधित

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून काल सरकारी लॅबकडून 11 तर खाजगी लॅबकडून 9 व्यक्तींचे करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत. एकूण 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेर गावाहून आलेल्या तिघा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 305 करोना संक्रमित आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

तालुक्यातील निमोण येथील 65 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, 12 व 14 च्या मुली, 21 वर्षीय तरुणी, 65 वर्षीय महिला, 16 वर्षांचा मुलगा तर शहरातील देवीगल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, लखमीपुरा येथील 50 वर्षीय पुरुष, मालदाड रोेड येथील 50 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, रहेमतनगर येथील 24 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महिला, घोडेकरमळा येथील 49 वर्षीय पुरुष, तर बाहेर गावाहून आलेल्यांमध्ये नान्नज दुमाला येथे मुंबईहून आलेले दोन व्यक्ती पॉझिटिव्ह तर शहरातील शिवाजीनगर येथे नाशिकहून आलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

संगमनेर शहरात आतापर्यंत 127 तर ग्रामीण भागात 175 करोना बाधीत व्यक्ती आढळून आल्या आहेत. काल बाहेरील गावाहून आलेल्या तीन व्यक्तींसह एकूण करोनाबाधितांची संख्या 305 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com