शिर्डीचे साईनाथ रुग्णालय 15 दिवसापासून पाण्यात

रुग्णांचे हाल || रुग्णालय तात्काळ सुरु करण्याची मागणी
शिर्डीचे साईनाथ रुग्णालय 15 दिवसापासून पाण्यात

शिर्डी | Shirdi

साईनाथ रुग्णालयात गेल्या 15 दिवसापासून पावसाचे पाणी असल्यामुळे विविध राज्यातून उपचारासाठी येत असलेला रुग्णांचा अतिरिक्त भार साईबाबा सुपर हॉस्पिटलवर पडत आहे. दोन्ही हॉस्पिटलमधील रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची मोठी दमछाक होत असून गर्दीअभावी रुग्णांना उपचार घेण्याकरिता दिरंगाई होत असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ साठलेले पावसाचे पाणी काढण्याकरिता जलदगतीने उपाय करून साईनाथ रुग्णालय रुग्णसेवेकरिता पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

संपूर्ण देशाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांनी विविध साथीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उदी देऊन त्यांचा आजार पळून लावला. विविध राज्यातून रुग्ण बाबांकडे उपचारासाठी येत असे. त्याचप्रमाणे आजही बाबांवर श्रद्धा असलेल्या विविध राज्यातील रुग्ण विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरिता शिर्डी येथे येतात. साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत आपला आजार नक्कीच बरा होईल याची खात्री मनाशी ठेवून दररोज हजारो रुग्ण शिर्डी येथील साईनाथ रुग्णालय व साईबाबा सुपर हॉस्पिटल या ठिकाणी येऊन उपचार घेण्याकरिता गर्दी करतात. बाबांनी दिलेली शिकवण यापुढेही चालू राहावी याकरिता साईबाबा संस्थाने सर्व सोयुक्त साईबाबा सुपर हॉस्पिटल व साईनाथ हॉस्पिटल सुरू करून गरजूंना आधार देण्याचे काम केले आहे.

साईनाथ रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा संस्थानने उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी प्रसुती, जनरल सर्जरी, दंत चिकित्सक, नेत्र, अस्थी, आयुर्वेदिक अशा विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी 10 रुग्णांकरिता अतिदक्षता विभाग व 250 रुग्णांना अ‍ॅडमिट होण्याची व्यवस्था आहे. जवळपास 25 तज्ञ वैद्यकीय अधिकारी व 300 कर्मचारी उपलब्ध आहे. तसेच साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे 40 बेडचे अतिदक्षता विभाग, 300 बेड रुग्णांना अ‍ॅडमिट होण्याकरिता व 40 तज्ञ डॉक्टरांची टीम आहे.

साईनाथ रुग्णालयात मोफत रुग्णांना उपचार व शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधा असल्यामुळे संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, नगर, बीड, नंदुरबार या जिल्ह्यासह राज्यातील व परराज्यातील रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेतात. त्यामुळे साईबाबा संस्थान लाखो रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारी ठरत आहे.

शिर्डीत दि. 31 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शिर्डी येथील अनेक रहिवासी, व्यावसायिक व शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे साईनाथ रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गेल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना तात्काळ साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परिणामी पावसाच्या पाण्यामुळे 15 दिवसापासून साईनाथ हॉस्पिटल बंद आहे. या ठिकाणी उपचार घेण्याकरिता येणार्‍या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा याकरिता साईबाबा संस्थाने साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे व्यवस्था केली आहे.

असे असले तरी साईनाथ रुग्णालय व साईबाबा सुपर हॉस्पिटल या दोन्ही रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याकरिता येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असून गर्दीमुळे रुग्णांना उपचार घेण्याकरिता अनेक तास वाट पाहवी लागत आहे. साईबाबा सुपर हॉस्पिटलवर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याकरिता रुग्णांना अनेक महिने वाट पाहवी लागत आहे.

प्रत्येक वर्षी वारंवार अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचून साईनाथ रुग्णालय बंद ठेवावे लागते. परिणामी येथे येणार्‍या हजारो रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून प्रशासनाने कायमस्वरूपी यावर उपाययोजना करून गरजू रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अतिवृष्टीमुळे साईनाथ रुग्णालय बंद असले तरी या ठिकाणी येणार्‍या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे रुग्णांना तात्काळ उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरिता व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याकरिता सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काळजी घेत आहे.

- प्रीतम वडगावे, वैद्यकीय संचालक, साईनाथ रुग्णालय

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com